आताची मोठी बातमी! 'मराठा आरक्षणाचा विषय येत्या दोन दिवसात सुटेल' मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही असा इशारा मराठा समाजाने दिलाय. उद्यापासून प्रत्येक गावात आमरण उपोषण केलं जाणर आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री तानाजी सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.   

Updated: Oct 28, 2023, 04:54 PM IST
आताची मोठी बातमी! 'मराठा आरक्षणाचा विषय येत्या दोन दिवसात सुटेल' मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य title=

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या दोन दिवसात सुटेल असा विश्वास आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) राज्य सरकार साधक-बाधक विचार करत आहे राज्य सरकार अत्यंत कळकळीनं या विषयावर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या विषयावर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरच भेटेल असंही सावंत म्हणाले. तुळजापूर मध्ये आरोग्य विभागाच्यावतीने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तानाजी सावंत यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आलं यानंतर पत्रकारांशी बोलताना सावंत यांनी मराठा आरक्षणाबद्दल आपलं मत व्यक्त केलं.

मराठा आरक्षण तीव्र
मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. गावोगावी नेत्यांना गावबंदी करण्यात आलीये. यातून विरोधीपक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदारही सुटलेले नाहीत. अशातच मराठा आरक्षणावरुन अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय. आरक्षण न मिळाल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू असा इशारा निलेश लंकेंनी सरकारला दिलाय. मावळमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ सुरु असलेल्या आंदोलनात निलेश लंके सहभागी झाले. सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींविरोधात मराठा समाजाचा रोष दिवसेंदिवस वाढतोय.त्यामुळे हा रोष कमी करण्यासाठी सत्तेतील मराठा लोकप्रतिनिधीच आंदोलनात सहभागी होऊन सरकारविरोधी भूमिका घेताना दिसून येतायत.

जरांगेंचा इशारा
सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावं, सरकारने मजा पाहू नये असा इशारा जरांगेंनी दिलाय. उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू होणार असून, गावागावात आमरण उपोषण केलं जाणार आहे. आमरण उपोषणात कुणाचा जीव गेल्यास सरकार जबाबदार असेल असं जरांगे म्हणालेयत. तर आरक्षणासाठी मराठा आमदार, खासदारांनी एकत्र यावं...समाजासाठी आमदार, खासदार मंत्री एकत्र येणार नाहीत त्यांना गावबंदी केली जाईल. बाहेर फिरूही देणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय.

रवी तुपकरांना घेराव
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना लातूरमध्ये मराठा तरुणांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. मराठा तरुणांनी तुपकरांना घेराव घातला. इतकच नाही तर त्यांना सोफ्यावरूनही उठवलं. तुपकरांची सोयाबीनचा दर आणि पीकविमासंदर्भात बैठक होती. या बैठकीनिमित्त ते लातुरात आले होते. मात्र, बैठकीच्या ठिकाणी जाऊन मराठा तरुणांनी गोंधळ घातला. गावबंदी असताना शहरात का आलात, मराठा आरक्षणविरोधी आहात का, अशा प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी त्यांनी तुपकरांविरोधात घोषणाबाजीही केली.