मुंबई : मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया सुकर होईल, अशी अपेक्षा आहे. अध्यादेश मंजूर करण्यासाठी उद्या मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यामुळे उद्याच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, अध्यादेश काढल्यानंतर २२७ विद्यार्थींना जिथे प्रवेश मिळाले होते तिथेच ते कायम राहतील.
अध्यादेश निघाला तर इतर प्रवेश प्रक्रियेसाठी तो लागू राहील.त्याचसोबत येत्या अधिवेशनात या अध्यादेशानुसार कायद्यात सुधारणा करू आणि मराठा आरक्षण प्रवेश प्रक्रियेचा तिढा सोडवू, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. आता विध्यार्थ्यांना लेखी आश्वासन देण्याचा प्रश्नच नाही, कारण अध्यादेश काढल्यावर प्रश्न सुटेल्यामुळे सरकार आणि मुख्यमंत्र्यांचा हेतू स्पष्टच, आहे हे सिद्ध झाले आहे, असे ते यावेळी म्हणालेत.
मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरु आहे. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. सरकारकडून कोणतही लेखी आश्वासन न मिळाल्याने हे आंदोलन सुरु आहे. तसेच सरकार अध्यादेश का काढत नाही, असा सवालही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने शासनाला अध्यादेश काढण्याबाबत परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्याच तो काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित होण्याची शक्यता आहे.
मुंबईत आझाद मैदानात वैद्यकीय पदव्युत्तर मराठा विद्यार्थ्यांनी न्याय मागण्यासाठी हे आंदोलन केले. राज्य सरकारने तत्काळ अध्यादेश काढावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. मराठा आरक्षणात या विद्यार्थ्यांनी प्रवेश कल्यानंतर त्यांचे आरक्षण रद्द केले आहे. यात विद्यार्थ्यांची चूक नसून राज्य सरकारने त्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.