दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने केलेले प्रयत्न सविस्तरपणे मांडले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण घटनाबाह्य असल्याच्या कारणावरून रद्द केले. त्यानंतर राज्य सरकारकडून विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.
राज्य सरकारने आणलेला अध्यादेश, नेमलेला आयोग, विधिमंडळात केलेला कायदा, सर्वोच्च न्यायालयात सरकारने दोनवेळा केलेले प्रयत्न याबाबतची सविस्तर माहिती पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्याला अशा प्रकारचे आरक्षण देण्याचा अधिकार नाही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून आवश्यक पावलं उचलण्यात यावी अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.