दुकानांवर मराठी देवनागरीत फलक बंधनकारक, नसेल तर काय कारवाई? जाणून घ्या

Marathi NamePlate:  मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर दिनांक 28 नोव्‍हेंबर 2023 पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Nov 25, 2023, 12:22 PM IST
दुकानांवर मराठी देवनागरीत फलक बंधनकारक, नसेल तर काय कारवाई? जाणून घ्या  title=

Marathi NamePlate: सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार बृहन्‍मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. त्‍यासाठी 24 विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ सुविधाकार व सुविधाकारांचे पथक गठीत करण्यात आले आहे. त्‍यांना कारवाईचे अधिकार देण्‍यात आले असून दिनांक 28 नोव्‍हेंबर 2023 पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी व्यापक बैठक घेऊन माननीय सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ.अश्विनी जोशी  आणि उप आयुक्‍त (विशेष) संजोग कबरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करीता विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ सुविधाकार व सुविधाकारांचे पथक गठीत करण्यात आले आहे. 

मराठी नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात न लावलेल्या दुकानांवर न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल. सदर बाब मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे  महानगरपालिका प्रशासनामार्फत स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. यासाठी दुकानदारांना कोणतीही नोटीस दिली जाणार नाही; तर, प्रती कामगार 2 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, 2018 आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, 2022 च्या अनुक्रमे नियम 35 आणि कलम 36 क च्या तरतूदींनुसार आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. 

25 सप्‍टेंबर 2023 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्‍यांना दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावण्याबाबत दोन महिन्यांची मुदत दिली होती. सदर मुदत दिनांक 25 नोव्‍हेंबर 2023 रोजी संपुष्टात येत असून दुकाने व आस्थापनांवर अधिनियमातील तरतुदींनुसार मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नाम फलकाबाबतची कारवाई मंगळवार दिनांक 28 नोव्‍हेंबर 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे.