'मेट्रो ३' च्या अडलेल्या कामाचा आर्थिक भुर्दंड मुंबईकर भरणार?

कारशेडची जागा बदलल्यास विलंबासोबत खर्चही अधिक वाढणार आहे

Updated: Dec 4, 2019, 02:38 PM IST
'मेट्रो ३' च्या अडलेल्या कामाचा आर्थिक भुर्दंड मुंबईकर भरणार? title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणाच्या नावाखाली आरे येथील मेट्रो ३ च्या कारशेड कामाला स्थगिती दिली. मात्र, या निर्णयाचा फटका मुंबईकरांना बसणार आहे. मेट्रो ३ चं पन्नास टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झालंय. हा प्रकल्प प्रगतीपथावर असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. पर्यावरणाच्या मुद्यावरून आरे कारशेडचा प्रश्न हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत गाजला. हा मुद्दा कोर्टात निकाली निघालेला असताना आता काम थांबवणं योग्य नसल्याची भूमिका भाजपनं घेतलीय. स्थगितीमुळं मेट्रो ३ प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत येण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. कारशेडची जागा बदलल्यास विलंबासोबत खर्चही अधिक वाढणार आहे.

३३.५ किमी लांबीच्या या मेट्रो ३ प्रकल्पाची अंदाजित किंमत २३, १३६ कोटी रुपये इतकी आहे. यासाठी जपानच्या जायका कंपनीनं १३,३२५ कोटी रुपयांचं कर्ज अल्प व्याजदरानं दिलंय. कारशेड कामाला स्थगिती दिल्यामुळं रोज किमान साडे चार कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. तसंच विलंबामुळं एकूण प्रकल्पाच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा भुर्दंड सामान्य मुंबईकरांना सोसावा लागणार असल्याचं भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटलंय.

आरेमध्ये कारशेड न झाल्यास 'मेट्रो ३' सुरूच होऊ शकत नसल्याचं स्पष्टीकरण यापूर्वी 'एमएमआरसीएल'च्या संचालिका अश्विनी भिडे यांनी दिलं होतं. आता आरेतील कारशेड जागेचा पुनर्विचार होणार असल्यास प्रकल्पाच्या कामालाच खिळ बसू शकते, अशी भीती आहे.

मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्यादृष्टीनं 'मेट्रो ३' प्रकल्प हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे. रोज १७ लाख प्रवासी यातून प्रवास करणार असल्यानं रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. परंतु, आरेतील मेट्रो कारशेडचे भूत पुन्हा उकरून काढल्यानं हा प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होण्याची चिन्हं आहेत.