मुलींशी बोलू नको सांगितल्याने संतापला विद्यार्थी; भररस्त्यात शिक्षकावर केला शस्त्राने हल्ला

Mira Bhayandar Crime : मीरा भाईंदरमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. आरोपी विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकावर दिवसाढवळ्या भररस्त्यात चाकूने हल्ला करुन पळ काढला आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 13, 2023, 05:25 PM IST
मुलींशी बोलू नको सांगितल्याने संतापला विद्यार्थी; भररस्त्यात शिक्षकावर केला शस्त्राने हल्ला title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : मीरा भाईंदरमध्ये (Mira Bhayandar) एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकावर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीची ओळख पटली असून पोलिसांनी (Mira Bhayandar Police) त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पीडित शिक्षक हा खासगी कोचिंग सेंटर चालवत असे. तिथे आरोपी विद्यार्थी शिकण्यासाठी येत होता. काही दिवसांपूर्वी त्याने आरोपी विद्यार्थ्याला एका मुलीसोबत बोलताना पाहिले होते. त्यावेळी पीडित शिक्षकाने मुलीसोबत न बोलण्यास आणि वेळेवर अभ्यास करण्यास सांगितले. त्याचाच राग मुलाला आला. याच रागातून मुलाने शिक्षकाने चाकूने हल्ला केला. हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. कोचिंग सेंटरच्या इतर विद्यार्थ्यांचा पालकांना हा सगळा प्रकार कळल्यानंतर त्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

राजू ठाकूर असे जखमी शिक्षकाचे नाव असून ते काशिमिरा येथील पेणकर पाडा कॅम्पसमध्ये बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये शिकवतात. पीडित शिक्षिक ठाकूर अकादमीच्या नावाने खाजगी क्लासेस घेतात. गेल्या गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास राजू ठाकूर हे रस्त्याच्या कडेला इतर मुलांसोबत उभे राहून बोलत असताना एक विद्यार्थी अचानक तिथे आला. त्यानंतर तो राजू ठाकूर यांच्या बाजूला आरामात जाऊन उभा राहिला. 

मात्र त्यानंतर अचानक आरोपीने मागून धारदार चाकू काढून राजू यांच्या पाठीवर वार केला. पहिल्या हल्ल्यानंतर राजू यांनी सावरण्याचा प्रयत्न करताच आरोपी विद्यार्थ्याने त्यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपीने पुन्हा  राजू यांना मारहाण केली आणि त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात राजू ठाकूर गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी हा अल्पवयीन असून त्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरूनच गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास आपल्या स्तरावर करत आहेत. शिक्षकाने आरोपी विद्यार्थ्याशी यापूर्वी गैरवर्तन केले होते का किंवा मारहाण केली नव्हती, याचाही पोलिस तपासात समावेश आहे. सध्या पोलीस आरोपी विद्यार्थ्याची चौकशी करत असून समुपदेशकाचीही मदत घेतली जात आहे.

पीडित राजू ठाकूर यांनी सांगितले की, "आरोपी विद्यार्थ्यासोबत त्यांचा कोणताही वाद नव्हता. काही दिवसांपूर्वी मी त्याला सांगितले होते की,जास्त मुलींशी बोलू नकोस आणि त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. तो वर्गातील मुलींशी खूप बोलायचा, म्हणून मी त्याला थांबवले होते. मला कळत नाही की त्याने या प्रकारावरुन माझ्यावर असा हल्ला का केला."