मुंबई : एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगरांचेंगरी निषेधार्थ संताप व्यक्त करण्यासाठी मनसेने मोर्चा काढला होता. या मोर्चाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.
यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘मी आजपर्यंत इतका खोटं बोलणारा पंतप्रधान पाहिला नाही’ इतकी जहरी टीका राज ठाकरे यांनी मोदींवर केली.
‘रेल्वे प्रशासनाला मी १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला असून या १५ दिवसात जर त्यांनी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेबाहेरील फेरीवाल्यांना हटवले नाही. तर १६व्या दिवशी माझे कार्यकर्ते त्यांना हटवणार. याला जबाबदार रेल्वे प्रशासन असेल’, असा इशारा त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला. एक नजर टाकुयात राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाच्या मुद्द्यांवर...
- आजचा मोर्चा आम्ही फार शांततेत काढला. पण जर यंत्रणेत सुधारणा झाल्या नाही तर यापुढचा आमचा मोर्चा शांततेत नसेल.
- देशातील सर्व न्यायाधीशांना, संपादकांना माझी विनंती आहे की, त्यांनी या सरकारच्या नादी लागू नये. या सरकारला वठणीवर आणा.
- मोदींनी जरा घराघरात जाऊन कान देऊन ऎकावं. त्यांना घराघरातून शिव्या पडतायेत. जीएसटीमुळे लोक हैराण झाले आहेत. इतका तुम्ही देश खड्ड्यात घातला आहे.
- जे सुरूयं ते सगळं खोटं सुरू असल्याचं भाजपमधील नेत्यांनाही माहित आहे. माझ्याशी भाजपचे अनेक लोक बोलतात. मला सगळं माहिती आहे.
- सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना पदावरून काढण्यात आलंय.
- तुम्ही आधीच्या सरकारच्या नावाने बोंब मारत होतात. आजही तेच प्रश्न तुमच्यासमोर आहे. तुम्ही काहीच करू शकत नाहीत. १५ लाख रूपये सर्वांच्या खात्यात येणार होते, तेथेही फसवलं.
- नितीन गडकरी म्हणाले होते, अच्छे दिन हे आमच्या घशातील अडकलेलं हाडूक आहे. म्हणजे अच्छे दिन येणार नाहीत.
- मुठभर लोकांसाठी तुम्ही बुलेट ट्रेन सुरू करणार हे सर्वांना माहिती आहे. सर्वातआधी बुलेट ट्रेनला मी विरोध केला होता. त्यानंतर बाकीचे बोलायला लागले होते. तुमचा बुलेट ट्रेनचा उद्देश मला चांगला माहिती आहे.
- देशात बदल घडेल म्हणून देशातील लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला आणि तुम्ही त्यांचा विश्वासघात केलाय.
- उर्जित पटेलांनी सांगितलं की, देशातील मंदी वाढणार...मग सरकारने कशासाठी निर्णय घेतले? सर्वांनी दयनीय परिस्थीती करून ठेवली आहे. कुणाकडे आशा लावून बसायचं?
- इतक्या वर्षांचे प्रलंबित प्रश्न आजही सुटत नाहीयेत. किड्या मुंग्यांसारखी माणसे मरतात आणि यांच्या उच्चस्तरीय बैठका सुरू होतात. पण त्यातून फायदा काहीच होत नाही.