Monsoon Update : केरळात (Kerala) अपेक्षित मुहूर्तावर न पोहोचणारा पाऊस सरतेशेवटी तिथं आला आणि अखेर भारतात मान्सूनचं आगमन झालं अशा वृत्तांनी सर्वांनाच दिलासा दिला. सुरुवातीला अतिशय चांगल्या वेगानं मान्सून पुढेही सरकला. पण, तळकोकणात आल्यानंतर मात्र अरबी समुद्रात आलेल्या Cyclone Biparjoy मुळं त्याचा वेग मंदावला आणि संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा घामाच्या धारांनी चिंब झाला. शेतकऱ्यांची कामं खोळंबली आणि सर्वसामान्यांना पावसाचीच आस लागली. अखेर या सर्व परिस्थितीत दिलासा देणारी माहिती हवामान विभागानं दिली असून, मान्सून नेमका कधी सक्रिय होणार आहे याबाबतच स्पष्ट सांगितलं.
हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार 23 जून (शुक्रवार)पासून मान्सून विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या किनारपट्टी भागात सक्रिय होईल. मराठवाड्यातही ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल. पुढच्या दोन दिवसांत म्हणजेच 24- 25 जून अर्थात शनिवार आणि रविवारी पावसाचा जोर कमाल असेल. सध्याच्या घडीला मोसमी वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असल्या कारणानं राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून पूर्णपणे स्थिरावेल अशी माहिती स्पष्ट करण्यात आली.
सध्याच्या घडीला मृग नक्षत्र सुरु असून परंपरेप्रमाणं शेतकरी पूर्ण तयारीनिशी शेतीच्या कामांना सुरुवात करण्याच्या प्रतीक्षेत असतानाच आभाळावरून काही त्याची नजर हटेना. कारण, पावसाचे ढग ज्या वेगानं येत आहेत तितक्याच वेगानं ते पुढेही जात आहेत. त्यामुळं आता हा मान्सून नेमका किती चकवा देणार? हाच प्रश्न बळीराजानं उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
प्रतीक्षेचा अंत पाहणारा हा पाऊस आता हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बरसून शेतकऱ्यांची चिंता मिटवणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात असणाऱ्या वाऱ्याची स्थिती पाहता त्या पट्ट्यातील मान्सून आणखी सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. परिणामी विदर्भात चांगला पाऊस होऊ शकतो. तर, मध्य महाराष्ट्रात मात्र तुलनेनं हा जोर काहीसा कमीच असेल.
खासगी हवामानसंस्था Skymet च्या माहितीनुसार येत्या 24 तासांमध्ये झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार येथे पावसाच्या मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आबे. तर, आसाम आणि सिक्कीममध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू या भागांमध्येही पावसाची हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे.