यंदा मान्सून राज्यात उशिराने दाखल होणार

दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला पावसासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 

कृष्णात पाटील | Updated: May 15, 2019, 03:43 PM IST
यंदा मान्सून राज्यात उशिराने दाखल होणार  title=
Pic Courtesy : DNA

मुंबई : दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला पावसासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मान्सून यंदा ५ दिवसांनी उशिरा दाखल होणार आहे. दरवर्षी केरळमध्ये १ जूनला दाखल होणारा मान्सून यावेळी ६ जूनला दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १८ किंवा १९ मे रोजी मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो पुढे सरकेल. त्यामुळे मान्सून ६ जूनला केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 

महाराष्ट्राच्या तळकोकणात दरवर्षी साधारणत: १० जूनला मान्सून दाखल होतो. यंदा मान्सून केरळमध्येच उशिरा दाखल होणार असल्याने राज्यातही तो उशिरानेच दाखल होण्याची शक्यता आहे. जर अरबी समुद्रातील वातावरण अनुकूल राहिले तर मान्सून तळकोकणात लवकरही येवू शकतो, असे मत कुलाबा वेधशाळेच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी व्यक्त केले आहे.

परंतु वातावरण अनुकूल न राहिल्यास जूनच्या मध्यावर तळकोकणात पाऊस दाखल होवू शकतो. यंदा सरासरी इतका पाऊस देशात पडण्याची शक्यता आहे. ९६ टक्के ते १०४ टक्के इतका पाऊस पडू शकतो. परंतु यापेक्षा अतिरिक्त पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे. हा अंदाज संपूर्ण देशासाठी आहे, असे हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्रच इतका पाऊस लागेलच असे नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.