पर्रिकरांच्या रुपात आम्ही एक चांगलं नेतृत्व गमावलं - शिवाजी आढळराव पाटील

 भारताच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख 

Updated: Mar 18, 2019, 05:33 PM IST
पर्रिकरांच्या रुपात आम्ही एक चांगलं नेतृत्व गमावलं - शिवाजी आढळराव पाटील title=

मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. संपूर्ण देशभरात त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत असताना शिरुर लोकसभेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी मनोहर पर्रिकरांच्या आठवणींना उजाळा दिला. मनोहर पर्रिकर यांची आणि माझी गेल्या २५ वर्षापासून मैत्री होती. भारताच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. ज्यावेळी ते देशाचे संरक्षणमंत्री झाले त्यावेळी विविध कामांच्या निमित्ताने माझी त्यांच्याशी जवळीक वाढली मात्र, आता आम्ही चांगलं नेतृत्व गमावल्याचे दु:खं वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

राजकीय जाणिवा असलेला विद्यार्थी ते संरक्षणमंत्री असा मनोहर पर्रिकरांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी होता. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झालं. त्यानंतर देशभरातून शोक व्यक्त होत आहे. ६३ वर्षाच्या कार्यकाळात ते ४ वेळा गोव्याचे मुख्यमंत्री होते. मनोहर पर्रिकर १९९४ मध्ये राजकारणात आले. भाजप उमेदवार म्हणून त्यांनी पहिली निवडणूक लढवली. पणजी विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले.