तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन (Yakub Memon)याच्या कबरीवरुन नवा वाद सुरु झाला आहे. याकूब मेमनच्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची माहिती समोर आली आहे. कबरीवर मार्बल आणि LED लाईट्स लावण्यात आल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर आता कबरीवरील एलईडी लाईट्स पोलिसांनी काढल्या आहेत.
मात्र यावरुन आता नवा वाद पेटला आहे. याप्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत. महापालिका , जामा मशिद आणि इतरांची मुंबई पोलीस चौकशी करणार आहे. तर दुसरीकडे यावनरुन राजकारणनही पेटलं आहे.
"सत्तेत असताना सेना दाऊद समर्थक होती हे पाहिले होते. आता इतकी अधोगती झाली की ते दाऊदचे प्रचारक झाल्याचे दिसून येत आहे. याकुब मेननची कबर वाचविण्यासाठी पेंग्विन सेनेने बचाव मोहीम चालवावी," अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी केली आहे.
तर राजकारण व्हावं, पण किती खालच्या पातळीवर जाऊन करावं याला मर्यादा असते. आज आरोप झाले ते खोटे आहेत. धार्मिक वाद निर्माण करायचे हे योग्य नाही. सत्य परिस्थिती समोर येणे गरजेचे आहे, असे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटलं आहे.
याबाबत बोलताना खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संताप व्यक्त केला. तुम्हा लोकांनाच लोकशाही पाहिजे होती. राजेशाही असती तर हे होऊनच दिलं नसतं, असे उदयनराजे म्हणाले.
काय म्हणाले उदयनराजे?
"राजेशाही नको आणि लोकशाही हवी अशी मागणी तुम्हीच केली होती. आता लोकशाहीतले राजे तुम्ही आहात त्यामुळे तुम्हीच निर्णय घ्यायचा आहे. राजेशाही असती तर हे होऊनच दिलं नसतं. एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने ही गोष्ट ऐकली. पण आधीच्या महाविकास आघाडी सरकारने त्याविरोधात कारवाई का केली नाही," असा प्रश्न खासदार उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, यावेळी प्रतापगडावरील अफजल खान कबरी बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ती कबर प्रशासनाने खुली करावी अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी केली आहे.