Molestation of Woman Passenger In BEST Bus: मुंबईमधील धावत्या 'बेस्ट' बसमध्ये एका महिला वकिलावर लैंगिक छळ केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी एका 38 वर्षीय इसमाला अटक केली आहे. पीडितेने आरडाओरड केल्याने आरोपी बसमधून उतरुन पळून गेला होता. मात्र या महिलेने आरोपी बसमधून उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच आपल्या मोबाईलवर त्याचा व्हिडीओ शूट केला होता. याच व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं आहे.
हा संपूर्ण प्रकार 4 जुलै रोजी सकाळी 10 वाजच्या सुमारास बेस्ट बस क्रमांक 172 मध्ये घडल्याची माहिती 'मिड डे'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. प्रवासादरम्यान कोणीतरी आपल्या शरीराला मागून विचित्र पद्धतीनं स्पर्श करत असल्याचं, काहीतरी आपल्याला टोचत असल्याचं या महिला वकिलाला जाणवलं. या महिलेने मागे वळून पाहिलं असता आरोपी तिच्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. या महिलेने लगेच आरडाओरड केला. मात्र बेस्ट बसच्या चालक आणि कंडक्टरने या महिलेकडे लक्ष देईपर्यंत आरोपी बसमधून उतरुन पळून गेला. तरीही या महिलेनं प्रसंगावधान दाखवत पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. या महिलेने दादर पोलीस स्टेशनला जाऊन घडलेल्या प्रकारासंदर्भात तक्रार नोंदवली.
दादर पोलिसांनी कलम 354 अ (लैंगिक छळ करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध सुरु केला. "आमच्याकडे आरोपीची ओळख पटवण्यासाठी अवघ्या काही सेकंदांचा व्हिडीओ होता. तसेच हा आरोपी प्रभादेवी येथील आगार बाजारजवळ उतरला. आम्ही सर्व बस स्टॉपवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहण्यास सुरुवात केली," असं दादर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. "आरोपी वारंवार आपला मार्ग बदलत होता. त्याने दुसरी बस पकडल्याने त्याला शोधून काढणं फार कठीण होतं," असंही पोलिसांनी सांगितलं.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्णा सागडेंच्या नेतृत्वाखाली हवालदार संतोश पाटणे, अजित महाडीक, गणेश माने आणि महेश कोलते यांच्या टीमची स्थापना करुन या इसमाचा शोध सुरु केला. तांत्रिक माहितीच्या आधारे आणि सीटीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी अॅण्टॉप हील येथील कोकारी आगारच्या आजूबाजूला शोध सुरु केला. पोलिसांनी सलग 5 दिवस शोध सुरु ठेवल्यानंतर अखेर 9 जुलै रोजी त्यांनी नारायण महंतो या 38 वर्षीय व्यक्तीला या प्रकरणात अटक केली.
महंतो हा शीव येथे वॉचमनची नोकरी करतो. सोमवारी त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.