Mumbai Air Quality Index : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Climate) वातावरणात प्रचंड धुरकं असल्याचं पाहायला मिळत आहे. समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं शहरात एकाएकी धुक्याचं प्रमाण वाढलं आणि त्यातच प्रदुषणाची पातळीही लाढल्यामुळं मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता दर दिवसागणिक खालावली. (Mumbai Air Quality) मुंबईत हवेचा स्तर 315 इतका नोंदवला गेला ज्या धर्तीवर हे प्रमाण ‘खराब’ गुणवत्तेचे असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. संकटात भर म्हणजे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हवेची गुणवत्ता घसरल्यामुळे आणि सततच्या वाढत्या प्रदुषणामुळे मुंबईकरांवर आजारपणाचं संकटही घोंगावत आहे.
तुम्हालाही गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यात काही अडचणी उदभवत असतील तर, आताच काळजी घ्या. कारण, हवेत वाढलेल्या प्रदुषणामुळं श्वसनाचे आजार बळावले आहेत. घसा खवखवणे, खोकला, सर्दीसह- ताप अशी लक्षणं असणाऱ्यांची संख्या 10 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे. दिवसभर उकाडा आणि रात्री अचानक वाढणारी थंडी अशा वातावरण बदलांमुळेही आजार बळावल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
मुंबईत हवेचा स्तर 315 इतका नोंदवला गेला आहे, तर दिल्लीमध्ये हाच आकडा 263 वर असल्याचं पाहायला मिळालं. आकड्यांमध्ये असणारा फरकच मुंबईतील हवा किती प्रदूषित आहे ते स्पष्ट करत आहे.
मुंबईतील या परिस्थितीमागचं कारण काय?
तज्ज्ञांच्या मते मुंबईत सध्या हवामान अंशत: स्थिर आहे, वाऱ्याचा वेग मंद आहे. पण, तरीही वातावरणामध्ये असणाऱ्या या धुरक्याचं प्रमाण आणि प्रदूषणाचा स्तर पाहता या सर्व परिस्थितीला मुंबई मेट्रो आणि सारगी मार्ग प्रकल्पांचं सुरु असणारं बांधकाम कारणीभूत ठरत आहे. अनेक ठिकाणांवर खोदकाम आणि इतर तत्सम कामं सुरु असल्यामुळं त्यातून निघणारी धुळ हवेमध्ये मिसळत आहे. वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळं हे धुलिकण हवेत अधिक काळासाठी तरंगत आहेत यामुळं मुंबईत प्रदूषित हवा वाढताना दिसत आहे. सदर स्थिती/ संकट हे पूर्णत: मानवनिर्मित असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
मुंबई हे एक बेट असूनही तिथं गगनचुंबी इमारती उभारून हवेच्या प्रवाहात अनेक अडथळे तयार करण्यात आले आहेत. सध्याच्या घडीला अनेक गोष्टी नैसर्गिक आणि वैज्ञानिक नियमांच्या विरोधात जाऊन साकारल्या जात आहेत. त्यामुळं या संकटावर नियंत्रण आणण्यासाठीसुद्धा तुम्हीआम्हीच प्रयत्न करावे लागणार आहेत ही बाब नाकारता येत नाही.