मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरच्या सीमेवर असलेला महत्वाचा अमर महल उड्डाणपूल वाहतुकीकरता पूर्णपणे खुला होण्यास आणखी सात महिने लागणार आहेत.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अमर महल उड्डाण पुलाच्या उत्तर दिशेच्या बाजूच्या सांध्यावरील बोल्ट निघाल्याचे लक्षात आले होते. यामुळे काही काळ वाहतूक बंद ठेवून पाहणी करण्यात आली. त्यावेळी उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक असल्याचं दिसून आले होते. तेव्हा उत्तर बाजूकडील बंद ठेवत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. तेव्हा उत्तर बाजूकडील काम हे नोव्हेंबर अखेरीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
दक्षिण दिशेकडच्या उड्डाणपुलाचा भाग दुरुस्तीसाठी घेत मार्चपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. शनिवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमर महल उड्डाण पुलाची पहाणी केली असता पूर्ण उड्डाणपूल मार्चपर्यंत वाहतुकीकरता खुला होणार असल्याचं स्पष्ट झालं.