मुंबै बँक निवडणुकीत अनोखी युती, भाजपच्या प्रवीण दरेकरांसाठी शिवसेनेची माघार

सातत्याने कुरघोडी करणाऱ्या शिवसेना आणि भाजपचं मुंबै बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी एकदिलाने काम 

Updated: Dec 17, 2021, 07:26 PM IST
मुंबै बँक निवडणुकीत अनोखी युती, भाजपच्या प्रवीण दरेकरांसाठी शिवसेनेची माघार title=

मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालकपद निवडणुकीच्यानिमित्ताने राज्यात अनपेक्षित राजकीय समीकरणे जुळून येताना दिसत आहेत. राज्यात सत्तेत असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष मुंबै बँकेच्या निवडणुकीत भाजपबरोबर एकत्र आले आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हे तीनही पक्ष सरसावले आहेत. 

भाजप नेते आणि विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मदतीला शिवसेना धावून आली आहे. मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत प्रविण दरेकरांचं अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेने माघार घेतली आहे. नागरी बँक गटातून प्रविण दरेकर यांच्यासाठी शिवसेनेच्या अभिजीत अडसूळ यांनी माघार घेतली आहे. 

मजूर संस्था गटातून विरोधकांनी उमेदवारीला आक्षेप घेतल्यानं प्रविण दरेकरांची उमेदवारी धोक्यात आली होती. सहकार विभागानेही याप्रकरणी प्रवीण दरेकर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. प्रविण दरेकरांनी मजूर संस्था गट आणि बँकींग गट अशा दोन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण मजूर संस्था गटातून उमेदवारीला आक्षेप घेतल्याने प्रवीण दरेकर आपला अर्ज मागे घेतील. 

पण नागरी बँक गटातून आता शिवसेनेच्या अभिजीत अडसूळ यांनी माघार घेतल्यानं प्रविण दरेकर यांची या गटातून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. 

अभिजीत अडसूळ हे सेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पूत्र असून ते सध्या ईडीच्या रडारवर आहेत. अभिजीत अडसूळ यांना मुंबई जिल्हा बँकेत स्विकृत संचालक म्हणून घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळतेय.