सचिन गाड, झी मीडिया, मुंबई : अंतर्वस्त्र उद्योगातलं बडं प्रस्थ अशी ओळख असलेले व्यावसायिक हर्षद ठक्कर गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी ठक्कर यांनी लिहीलेलं एक पत्र सापडलं आहे. दादरच्या भवानी शंकर रोडजवळ असलेलं आशापूरा इंटिमेट फॅशन लिमीटेडच्या कार्यालयात हर्षद ठक्कर यांना शेवटचं पाहिलं गेलं. २ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता मिटींग संपल्यावर मात्र ठक्कर यांना कोणी बघितलं नाही, की कोणाशी त्यांचं संभाषणही झालं नाही. ७ ऑक्टोबरला मरिन ड्राईव्हजवळ पोलिसांना एक मृतदेह सापडला असून तो ठक्कर यांचा आहे का याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तो डीएनए तपासणीसाठी पाठवला आहे.
बेपत्ता होण्यापूर्वी ठक्कर यांनी कुटुंबीय आणि भागधारक यांना एक पत्र लिहीलं. या पत्रात कंपनीच्या ढासळत्या शेअर्सच्या किंमतीला स्टॉक मार्केटमधील त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना जबाबदार धरलंय.
मला आणखी काही नकोय, पण यापुढे माझं काय होणार हे माहिती नाही. मी तुमची माफी मागतो. एवढ्या लोकांच्या नुकसानीला मी जबाबदार असून या ओझ्याखाली मी जगू शकत नाही. नुकसानीची भरपाई करण्यासाठी खासगी मालमत्ताही गहाण ठेवली आहे असं पत्रात हर्षद ठक्कर यांनी म्हटलंय.
ठक्कर हे आशापूरा इंटिमेट्स फॅशन या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांची व्हॅलेंटाईन आणि ट्रीकी या ब्रँडची उत्पादनं चांगलीच गाजली आहेत. कोणतंही भांडवल हाताशी नसताना ठक्कर यांनी कंपनी स्थापली आणि नावारूपालाही आणली. अशा हरहुन्नरी व्यावसायिकाच्या अशा बेपत्ता होण्याने व्यावसायिक जगात आश्चर्य व्यक्त होतंय.