close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गाडीचा एसी सुरु करून घेतलेली विश्रांती जिवावर, गुदमरुन मृत्यू

गाडीचा एसी सुरू करून घेतलेली क्षणभर विश्रांती जिवावर बेतू शकते. सावधान, कारमध्ये एसी लावून झोपताय? 

Updated: Jun 14, 2019, 06:07 PM IST
गाडीचा एसी सुरु करून घेतलेली विश्रांती जिवावर, गुदमरुन मृत्यू

अमोल पेडणेकर, मुंबई : गाडीचा एसी सुरू करून घेतलेली क्षणभर विश्रांती जिवावर बेतू शकते. सावधान, कारमध्ये एसी लावून झोपताय?, एसी लावून झोपणं जिवावर बेतू शकते. अशी घटना ही विक्रोळीत घडली आहे. कारमध्ये गुदमरून एकाचा मृत्यू झाला. विक्रोळीत गाडीत एसी सुरु करुन सुरेश डबडे यांनी विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा गुदमरल्यामुळे  मृत्यू झाला. त्यामुळे एसी सुरु करुन कारमध्ये झोपणे धोकादायक आहे. 

मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट परिसरातील वीर सावरकर मार्गावर उभ्या असलेल्या एका कारमध्ये चालकाचा मृतदेह आढळला. गाडीचा एसी चालू ठेवून झोपल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुरेश डबरे असे या कारचालकाचे नाव आहे. दोन दिवसांपासून ते घरी गेले नव्हते. कारमधून दुर्गंधी येत असल्याचे काही नागरिकांना आढळले. पाहणी केल्यानंतर कारचालक मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला, अशी माहिती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली. 

यामुळे गाडीतील ऑक्सिजनची मात्रा संपते!

प्रवासादरम्यान विश्रांती घेण्यासाठी अनेकदा कारचालक गाडीचे खिडक्या बंद करतात. गाडीत हवेत ऑक्सिजनची मात्रा असेपर्यंत चालकाचा श्वासोच्छावास सुरू राहतो. कालांतराने आपल्या शरिरातून कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन झाल्यामुळे गाडीमध्ये ऑक्सिजन कमी होऊन कार्बनडाय-ऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढते. 

आणि हृदयाचे ठोके मंदावतात 

साधारणपणे शरिरात ९८ ते ९९ टक्के ऑक्सिजनची गरज असते. हवेत ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते. त्यानंतर हृदयाचे ठोके मंदावतात आणि चालकाची शुद्ध हरपते. झोपेत असताना पुरेशा ऑक्सिजनच्या अभावी शरिरात होणाऱ्या या बदलांचा अंदाज कोणालाही येत नाही आणि माणसाचा गुदमरून मृत्यू होतो, अशी माहिती रेडिओलॉजिस्ट डॉ. आनंद प्रधान यांनी दिली. 

गाडीत गुदमरून मृत्यू ओढावण्याची ही पहिलीच घटना नाही. त्यामुळे आपला प्रवास सुखकर करण्यासाठी प्रवासादरम्यान पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे डॉक्टर सांगतात.