'वायू' वादळामुळे राज्यातील पाऊस लांबण्याची शक्यता

वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस लांबणीवर पडल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

Updated: Jun 14, 2019, 04:50 PM IST
'वायू' वादळामुळे राज्यातील पाऊस लांबण्याची शक्यता   title=
Pic Courtesy : PTI

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांनी पावसाचा अनुभव घेतला आहे. महाराष्ट्रातही मान्सून पूर्व सरी कोसळत असल्या तरी आता वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस लांबणीवर पडल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मॉन्सून साधारणतः १३ जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता असतानाच अरबी समुद्रात वायू वादळाची निर्मिती झाली. चक्रीवादळामुळे मॉन्सूनची वाटचाल संथ झाली. त्यामुळे पाऊस उशिरा दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायू चक्रीवादळाने समुद्रावरील बाष्प ओढून घेतल्याने मॉन्सूनचे राज्यातले आगमनही लांबले आहे. वायू चक्रीवादळ निवळल्यानंतर पावसासाठी पुन्हा पोषक स्थिती निर्माण होण्यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. याच काळात बंगालच्या उपसागरातून मॉन्सूनची प्रगती शक्य आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणारे मान्सूनचे वारे राज्यात आधी पोहोचू शकतात. त्यानुसार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.