मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या महागठबंधनवर जोरदार निशाणा साधला आहे. महागठबंधनचा सोमवारी एक, मंगळवारी एक, बुधवारी एक असा पंतप्रधान असेल आणि शरद पवार रविवारी पंतप्रधान असतील, कारण त्यादिवशी सुट्टी असते, असा टोमणा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसंच तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? असा सवालही फडणवीसांनी महागठबंधनमधल्या नेत्यांना विचारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंह असून विरोधक कोल्हे असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ममता बॅनर्जी, शरद पवार, मुलायम सिंग हे एका भागातील नेते आहेत. दुसऱ्या भागात गेले तर यांच्या सभेसाठी कोणी येणार नाही. पण मोदी कुठेही सभेला गेले तर त्यांच्या सभेला लाखांची गर्दी होते. 'इलाके कुत्ते-बिल्लीके होते है, मोदीजी शेर है'. जनावरं कितीही एकत्र आली तरी ती सिंहाला पराभूत करू शकत नाहीत, असं फडणवीस म्हणाले.
चोरांचा चोरी करता येत नाही म्हणून सगळे चोर आता एकत्र येत आहेत, असं टीकास्त्र मुख्यमंत्र्यांनी सोडलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आज यात्रा निघत आहेत, पण त्याची जत्रा झाली आहे. यांनी कितीही यात्रा काढल्या तरी जनता भाजपसोबत आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या देशाला मजबूत सरकार हवंय, मजबूर नको. मोदी पुढचे पाच वर्ष लाभले नाहीत तर त्यांचं नाही तर भारताचं नुकसान होईल, अशी भीतीही फडणवीसांनी व्यक्त केली.
गरिबी हटावचा नारा दिला जायचा, पण गरिबी हटली ती काँग्रेसच्या नेत्यांची आणि त्यांच्या चेल्यांची, असा आरोप फडणवीस यांनी केला. यापूर्वीचे पंतप्रधान मुके होते त्यांना रिमोटद्वारे नियंत्रित केलं जायचं, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. मुंबईतल्या सीएम चषक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली.