तरुणाने ऑनलाईन सर्च केला आत्महत्येचा सोपा मार्ग, गुगलची थेट अमिरेकेतून मुंबई पोलिसांना माहिती

मुंबईतल्या एका उच्चशिक्षित तरुणाने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला, यासाठी त्याने गुगलवर माहिती सर्च केली  

Updated: Feb 18, 2023, 01:01 PM IST
तरुणाने ऑनलाईन सर्च केला आत्महत्येचा सोपा मार्ग, गुगलची थेट अमिरेकेतून मुंबई पोलिसांना माहिती title=

मुंबई : इंटरनेटमुळे (Internet) आपल्याला जगातील कोणतीही माहिती बसल्याजागी मिळवणं अगदी सहज शक्य होतं. एखाद्या देशाची असो की एखाद्या व्यक्तीची असो, खोल समुद्रातील असो किंवा अंतराळाशी जोडली गेलेली असो गुगलवर सर्च (Google Search) केल्यावर एका क्षणात आपल्याला त्याबद्दल सखोल माहिती मिळते. पण या काहीवेळा या माहितीचा चुकीचा वापर केला जातो. अशीच एक घटना मुंबईतून (Mumbai) समोर आली आहे. मुंबईत एका तरुणाने कोणता त्रास होऊ न देता आत्महत्या (Suicide) कशी करावी याची माहिती गुगलवर सर्च केली.

गुगलने मुंबई पोलिसांना दिली माहिती
गुगलच्या (Google) अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी तात्काळ याची माहिती मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिली. मुंबई पोलिसांनीही तत्पर पावलं उचलत तरुणाचं लोकेशन शोधलं आणि त्याला आत्महत्या करण्यापासून रोखलं. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतल्या नेशनल सेंट्रल ब्यूरो-इंटरपोलने (National Central Bureau-Interpol) आयपी अॅड्रेस आणि ठिकाणाची माहिती मुंबई पोलिसांना दिली. याआधारे पोलिसांनी त्या तरुणाचं लोकेशन ट्रेस केलं. हा तरुण मुंबईतल्या कुर्ला परिसरात राहणारा आहे. 25 वर्षांचा हा तरुण एका आयटी कंपनीत काम करतो. 

लोकेशन ट्रेस झाल्यावर मुंबई पोलिस थेट त्या तरुणाच्या घरी धडकले. पोलिसांनी त्या तरुणाचं काऊन्सिलिंग (Counciling) केलं. कुर्ला परिसरात राहणारा हा तरुण एका खासगी आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करतो. शिक्षण आणि इतर कामांसाठी त्या तरुणाने खासजी संस्थांकडून मोठ्याप्रमाणावर कर्ज घेतलं होतं. हे कर्ज कसं फेडावं या चिंतेने तो ग्रासला होता. 

आत्महत्येचा निर्णय घेतला
आर्थिक परिस्थितीला कंटाळलेल्या या तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने गुगलवर आत्महत्येचा सोपा मार्ग याची माहिती शोधली. गुगलने दाखवलेली समयसूचकता आणि मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे तरुणाचा जीव वाचला.

आयआयटीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
दरम्यान मुंबईतल्या पवई इथं असणाऱ्या आयआयटीत (IIT) शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. दर्शन सोलंकी असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. आयआयटीत बीटेकच्या पहिल्या वर्षात तो शिकत होता. काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जातीभेद केला जात असल्यामुळे तो त्रस्त होता. दर्शनच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शन लहानपणापासूनच हुशार होता, अभ्यासाच्या तणावातून तो आत्महत्येसारखं पाऊल उचलणं शक्य नाही.