शाहरुखच्या मुलाला अडकवण्याचा कट? समीर वानखेडेंविरोधात सीबीआयच्या FIR मध्ये धक्कादायक खुलासे

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आता स्वत:च अडचणीत सापडले आहेत. सीबीआयने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

मेघा कुचिक | Updated: May 15, 2023, 03:42 PM IST
शाहरुखच्या मुलाला अडकवण्याचा कट? समीर वानखेडेंविरोधात सीबीआयच्या FIR मध्ये धक्कादायक खुलासे title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या समोरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडे (Shahrukh Khan) 25 कोटींची लाच मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. सीबीआयने (CBI) दाखल केलेल्या FIR मध्येच ही माहिती नमुद करण्यात आलीय. समीर वानखेडेंनी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीकडे (Pooja Dadlani) आधी 25 कोटी मागितले. मग त्यांच्यात 18 कोटींवर डील फायनल झाली, त्यापैकी 50 लाख रुपये वानखेडेंनी अॅडव्हान्समध्ये घेतले असा उल्लेख या एफआयआरमध्ये आहे. ड्रग्स प्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक करण्यात आली होती. मात्र हा सर्व कट समीर वानखेडे यांनी रचल्याचंही यात नमुद करण्यात आलंय..

सीबीआयच्या एफआयआरमध्ये काय पाहूयात?
समीर वानखेडेंच्या आदेशानुसानंतर किरण गोसावी (Kiran Gosavi) आर्यनला घेऊन आला. कार्यपद्धतीबाहेर असूनही गोसावीला अधिकार दिले. याविषयी महागड्या गाड्या तसंच घड्याळांचा समीर वानखेडेला हिशेब देता आला नाही. घोषित केलेल्या मालमत्तेपेक्षा अधिक संपत्ती मिळवली तसंच परदेश वारीबाबत योग्य स्पष्टीकरण समीर वानखेडे यांना देता आलं नाही, असं या एफआयआरमध्ये नमुद करण्यात आलं आहे. 

आरोपी समीर वानखेडे आणि इतर जणांनी हा कट कसा रचला याबद्दलची माहिती सीबीआयच्या FIR मध्ये दिला आहे. आर्यन खान एनसीबीच्या आणि खास करून आरोपी आणि पंच असलेल्या किरण गोसावीच्या ताब्यात आहे हे दाखवण्यासाठीच आर्यनचा ताबा किरण गोसावीला देण्यात आला होता. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट याच्याकडे जे चरस सापडलं ते सिद्धार्थ शाह या व्यक्तीकडून त्याने विकत घेतलं होता असा एनसीबी व्हिजिलन्सचा रिपोर्ट होता. पण वानखेडे आणि टीमने या सिद्धार्थ शाह नावाच्या व्यक्तीवर काहीही कारवाई न करता जाऊ दिलं. विशेष म्हणजे क्रूझवर 27 लोक असताना फक्त 10 लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचे सीबीआयने म्हटलंय.

याशिवाय NCB टीमने प्रत्यक्षात ड्रग्ज आणि पुरवठादार यांच्या ताब्यात असलेल्या लोकांना परवानगी दिली. अरबाज मर्चंटने चरस ताब्यात घेतल्याची कबुली दिली होती पण त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली. दोघांमधील गुन्ह्यातील चॅटकडे दुर्लक्ष करण्यात आलं, विशेष म्हणजे आरोपींना खासगी वाहनातून आणण्यात आलं आणि हे खाजगी वाहन केपी गोसावीचं होतं. गोसावी हे NCB कर्मचारी नसले तरी आरोपींना दाखविण्यासाठी हे केले गेलं.  केपी गोसावी याला नियमांविरुद्ध आरोपींच्या जवळ जाण्याची परवानगी देण्यात आली होती, असे मुद्देही एफआरआयमध्ये नमुद करण्यात आलं आहे. 

काय होतं नेमकं प्रकरण?
शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर देशभरात या प्रकरणाची चर्चा रंगली होती. 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईत एनसीबीने (Narcotics Control Bureau) एका क्रूझवर हाय-प्रोफाइल पार्टीवर छापा टाकला होता. यात आर्यन खानसह 10 लोकांना अटक केली. सुमारे तीन आठवडे तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन याची जामिनावर सुटका झाली. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या नेतृत्वात हा छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर होते.