कोरोनात कमी झालेल्या घरांच्या किंमती आता पुन्हा वाढणार?

मुंबईत घर घेण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची... पाहा व्हिडीओ

Updated: Nov 21, 2021, 08:25 PM IST
कोरोनात कमी झालेल्या घरांच्या किंमती आता पुन्हा वाढणार? title=

मेघा कुचिक, झी 24 तास, मुंबई: तुम्ही जर घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी. येत्या काळात घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईची झळ घरांनाही बसली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी खिसा हलका करावा लागू शकतो. 

आपलं एक छानसं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण महागाईमुळे सगळ्यांनाच घर घेणं शक्य होत नाही. आता तर ते आणखीच अवघड होऊन बसणार आहे. कारण गेल्या काही दिवसांत लोखंड आणि सिमेंटच्या किंमतीत सातत्यानं चढ उतार होत आहे. 

लोखंड आणि सिमेंटच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम घरांच्या किंमतीवर होत आहे. बांधकाम साहित्य महागल्यानं विकासकांनीही घरांच्या किंमतीही वाढवल्या आहेत.

फेब्रुवारी 2019 मध्ये प्रति टन लोखंडासाठी 38 हजार 300 रूपये द्यावे लागत होते. वर्षभरात म्हणजे मार्च 2020 मध्ये लोखंडाचे दर 50 हजार 600 रूपये इतके झाले.

ऑक्टोबर 2021 मध्ये ते 53 हजार 200 रुपयांवर पोहोचले. फेब्रुवारी 2019 मध्ये 50 किलो सिमेंटच्या एका गोणीची किंमत 225 रूपये इतकी होती. मार्च 2020 मध्ये ती 265 रूपयांवर पोहोचली.  तर ऑक्टोबर 2021 मध्ये सिंमेटच्या गोणीचा दर किंचित कमी होऊन 255 रूपये इतका झालाय.

सरकारनं लोखंड आणि सिंमेंटच्या किंमती नियंत्रित कराव्यात अशी मागणी एमसीएचआय क्रेडाईनं केली. कोरोनाच्या सावटातून बांधकाम व्यवसाय ब-यापैकी सावरलाय. 

मुद्रांक शुल्कात कोणतीही सवलत नसतानाही गेल्या दोन महिन्यात विशेषतः दिवाळीत घरांच्या विक्रीनं उच्चांक गाठला. मात्र घरासाठी लागणारं साहित्य महाग होत गेलं तर त्याचा परिणाम किंमतीवर निश्चितपणे होईल. स्वाभाविकच त्याचा मोठा फटका रिअल इस्टेट उद्योगाला बसू शकतो.