IND vs SA Final : टीम इंडियाची स्वप्नपूर्ती! साऊथ अफ्रिकेचा पराभव करून उचलली टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी

India vs South Africa T20 World Cup Final : टीम इंडियाने साऊथ आफ्रिकाचा पराभव करून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप नावावर केला आहे. हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला.

सौरभ तळेकर | Updated: Jun 30, 2024, 12:55 AM IST
IND vs SA Final : टीम इंडियाची स्वप्नपूर्ती! साऊथ अफ्रिकेचा पराभव करून उचलली टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी title=
India Win icc mens T20 World Cup 2024 trophy Beat South Africa by 7 runs

India Win T20 World Cup 2024 : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा फायनल सामना भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने साऊथ आफ्रिकाचा पराभव करून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप नावावर केला आहे. हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीच्या 76 धावा आणि अक्षर पटेलच्या 47 धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 176 धावा केल्या होत्या. तर साऊथ अफ्रिकाकडून हेन्रिक क्लासेनने 52 धावांची वादळी खेळी केली. पण हार्दिक पांड्याची घातक गोलंदाजी आणि सूर्यकुमार यादवच्या अफलातून कॅचने सामना पलटवला. बुमराहच्या गोलंदाजीसमोर साऊथ अफ्रिका चित झाली अन् टीम इंडियाने 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. तसेच 17 वर्षानंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरलंय. 

टीम इंडियाने दिलेल्या 177 धावांचं आव्हान पार करताना साऊथ अफ्रिकेची सुरूवात देखील खराब झाली. पहिल्या दोन ओव्हरमध्ये रीझा हेंड्रिक्स आणि कर्णधार एडन मार्कराम स्वस्तात परतले. त्यानंतर मात्र, क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्सने डाव सांभाळला अन् टीम इंडियाला बॅक फूटवर पाठवलं. तर स्टब्ल बाद झाल्यानंतर आलेल्या हेन्रिक क्लासेनने मैदानात वादळ उठवलं. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना चोप दिला. अखेर हार्दिक पांड्याने क्लासेनचं वादळ शांत केलं. अखेरच्या ओव्हरमध्ये साऊथ अफ्रिकेला 16 धावांची गरज होती. 

टॉस जिंकून कॅप्टन रोहित शर्माने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीला आलेल्या रोहित आणि विराटने पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरूवात करून दिली खरी पण नंतर साऊथ अफ्रिकेच्या केशव महाराजने टीम इंडियाला दोन धक्के दिले. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत एकामागोमाग बाद झाले. सूर्या देखील लगेच तंबूत परतल्याने टीम इंडिया अडचणीत आली होती. त्यानंतर मैदानात आलेल्या अक्षर पटेलने भारताचा डाव सावरला. तर विराट कोहलीने एक बाजू राखून धरली. अक्षरने काही खराब बॉलवर दांडपट्टा चालवला. तर विराटने धावसंख्या चालवली. विराट कोहलीने 59 बॉलमध्ये 76 धावा केल्या. तर अक्षरने 31 बॉलमध्ये 47 धावा कुटल्या. अक्षर धावबाद झाल्यानंतर शिवम दुबेने काही आक्रमक फटके मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अखेरच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजाने टीम इंडियाला 176 धावांवर पोहोचवलं.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.