मेघा कुचिक, मुंबई - मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे असा दावा नेहमीच केला जातो. मात्र मध्ये मुंबईत बलात्कार आणि त्यानंतर हत्या केल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. यामुळे मुंबई खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का हा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील दिंडोशी न्यायालयानेही मुंबई आणि महिला सुरक्षितता याबाबत गंभीर मत नोंदवले आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी मोहन चौहानला नुकतीच फाशीची शिक्षा ठोठावली. या निकालाची सविस्तर प्रत सार्वजनिक करण्यात आली आहे. या निकालात न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवले आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी मोहन चौहानला नुकतीच फाशीची शिक्षा ठोठावली. या निकालाची सविस्तर प्रत सार्वजनिक करण्यात आली आहे. या निकालात न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. रात्रीच्या वेळी मुंबई महिलांसाठी किती असुरक्षित आहे हे साकीनाका बलात्कार-हत्येतून दिसून येते असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले आहे. न्यायाधीशांनी साकीनाका बलात्कार आणि खून खटल्यातील २४४ पानांच्या आदेशात मुंबई शहर महिलांसाठी किती असुरक्षित बनले आहे याबाबत निरीक्षण नोंदवले आहे.
मुंबईत काळोख्या रात्री तिच्या किंकाळ्या कोणीही ऐकल्या नाहीत !
''मुंबईत अनेक सण विशेषतः गणपती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. संपूर्ण भारतातील लोकांना मुंबईत आणणारा हा सण आहे आणि तो शहरातील रस्त्यांच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. सणांच्या काळात हे शहर कधीच झोपत नाही. पण त्या काळोख्या रात्री, शहर इतके गाढ झोपेत होते की, या प्रकरणातील पीडितेच्या वेदनादायक आणि कोमेजणाऱ्या किंकाळ्या आणि आवाज कोणीही ऐकले नाही'' असे निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदवले आहे. केवळ एका महिलेची हत्या नव्हती, तर स्त्रीच्या प्रतिष्ठेचीही हत्या झाली असे न्यायलयाने म्हटले आहे.
न्यायाधीश शेंडे यांनी आदेशात म्हटले आहे की, ''तिला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि तिला टेम्पोमध्ये फेकून दिले, बलात्कार केला आणि नंतर खून केला, हे सर्व जबरदस्तीने, कठोरपणे आणि निर्दयीपणे केले गेले. हल्लेखोरचा हल्ला हा भ्याड होता ही केवळ एका महिलेची हत्या नव्हती, तर स्त्रीच्या प्रतिष्ठेचीही हत्या होती आणि यावरून महिलांसाठी रात्री एकट्याने किंवा त्यांच्या ओळखीच्या कोणासोबतही या शहरात राहणे किती असुरक्षित आहे हे दिसून आले.'' तर दुसऱ्या न्यायाधीशांनी कठोर शिक्षेचे समर्थन करताना निरीक्षण नोंदवले की, ''आरोपीने पीडितेवर भयंकर हल्ला केला तिची जिवंत राहण्याची शक्यता कमी होती. ही सर्वात दुर्मिळ घटना असून माझ्या मते फाशीची शिक्षा ही योग्य शिक्षा असेल." मूळचा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा असलेल्या 45 वर्षीय ड्रायव्हर मोहन काठवरू चौहानला याप्रकरणी दिंडोशी येथील सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
आरोपीला शिक्षा होण्यास कशामुळे मदत झाली?
चौहान यांचा बचाव संपूर्णपणे नाकारणारा आणि खोटा अर्थ लावणारा होता. तो म्हणाला होता की, खरा गुन्हेगार दुसरा कोणीतरी आहे. मात्र अनेक साक्षीदार आणि पुरावे होते ज्यामुळे आरोपीला अटक करण्यात मदत झाली. एका चौकीदाराने टक्कल असलेल्या एका माणसाला महिलेच्या गळ्यात कापड बांधून तिला ओढून नेत आणि तिला मारहाण करताना पाहिले होते. महिलेला टेम्पोमध्ये ओढत नेेताना देखील चौकीदाराने पाहिले होते. तिथले cctv फुटेजही पोलिसांच्या हाती लागले होते. तसेच दोषी चौहानने पोलीस कोठडीत असताना स्वेच्छेने जबाब दिल्याचेही न्यायालयाने शिक्षा ठोठावताना लक्षात घेतले.