MIDC Job: मुंबईत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवर बंपर भरती सुरु आहे. येथे दहावी ते पदवीधर अशा सर्वांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
एमआयडीसीच्या आस्थापनेअंतर्गत ग्रुप ए, बी आणि सी संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2), वीजतंत्री (श्रेणी-2), पंपचालक (श्रेणी-2), जोडारी (श्रेणी-2), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक आणि वीजतंत्री श्रेणी 2 (ऑटोमोबाईल) ही पदे भरली जाणार आहेत.
यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची अधिकृत वेबसाइट www.midcindia.org वर जाऊन अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक उमेदवारही यासाठी अर्ज करु शकणार आहेत.
या पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येतील. केंद्रावर होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची तारीख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
2 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून उमेदवारांना 25 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यानंतर ही लिंक बंद होईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
किमान 18 ते कमाल 38 वर्षे वय असलेले उमेदवारा यासाठी अर्ज करु शकतात. एससी/एसटी उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची सवलत दिली जाणार आहे तर ओबीसी उमेदवारांना यामध्ये 3 वर्षांपर्यंतची सवलत दिली जाईल.
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांकडून 1 हजार रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. तर मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांकडून 100 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे.