ट्रेनमध्ये स्टंट करणाऱ्या 'उद्धट' पूजावर गुन्हा दाखल पण कारवाई नाही

सुदैवानं वाचली म्हणून आभार मानणं तर सोडाच. ही मुलगी भलतीच उद्धट निघाली.

Updated: Oct 4, 2018, 11:10 AM IST
ट्रेनमध्ये स्टंट करणाऱ्या 'उद्धट' पूजावर गुन्हा दाखल पण कारवाई नाही title=

मुंबई  : लोकलमध्ये दरवाजात उभी राहिलेली आणि पडता पडता वाचलेली तरुणी सापडलीयं. माध्यमांनी गाठून त्या तरुणीला नेमकं काय घडलं, याबद्दल विचारलं तर ही मुलगी भलतीच आगाऊ निघाली. उपनगरीय गाडीमधील 'त्या' तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवयीन असल्यामुळे अद्याप कारवाई नाही. पूजा भोसले असं या तरुणीचं नाव आहे. ती शिवडीहून दिव्याला जात होती. सुदैवानं वाचली म्हणून आभार मानणं तर सोडाच. ही मुलगी भलतीच उद्धट निघाली.

जीवावर बेतलं असतं 

मुंबईच्या लोकलमध्ये दरवाजात उभं राहून मस्ती करणं किती अंगाशी येतं, त्याचा धक्कादायक व्हिडीओ झी २४ तासनं दाखवला. पूजा भोसले मुंबईच्या लोकलमध्ये दरवाजात उभी होती. विशेष म्हणजे गाडीत गर्दी नव्हती, बसायला जागाही होती, तरीही उगाच पूजा बाहेर दरवाजात उभी होती. तेवढ्यात बाजूनं दुसरी लोकल आली, त्या धक्क्यानं ती दचकली आणि खाली गेली. खाली घसरताना ट्रेनमधल्या एका व्यक्तीनं पूजाला सुदैवानं घट्ट पकडलं आणि तिचा हात सुटू दिला नाही. त्यामुळे ती कशीबशी वाचली. पण हे भलतं साहस जीवावर बेतू शकलं असतं.

'लोकलला दरवाजा लावा'

 शूट करणाऱ्याला शोधेन आणि त्याला जाब विचारेन असं ती मोठ्या तोऱ्याने सांगताना दिसत आहे. पूजाला लोकलमधल्या लोकांनी वाचवलं, ती अक्षरशः मरणाच्या दारातून परत आली. आता यापुढे तरी तू दरवाजात उभी राहून प्रवास करणार नाहीस ना, असं विचारताच तिनं पुन्हा उद्धटासारखं उत्तर दिलं. खरं ही पूजा कशीबशी वाचली पण  गिरे तो भी टांग ऊपर, असा ताठा कायम आहे..... दरवाजात उभं राहून प्रवास करू नका, असं सांगण्याऐवजी लोकलला दरवाजा लावा सांगतेय.

तुमची घरी कुणीतरी वाट पाहतंय

हे भलतं साहस तुम्ही करू नका. हा व्हिडीओ नेमका कुठल्या लोकलमधला आहे आणि कधीचा आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. पण मुंबईकरांनो, लोकलमधून सुरक्षित प्रवास करा. तुमची घरी कुणीतरी वाट पाहतंय, हे लक्षात ठेवा.