मुंबई : देशात कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले होते. ज्यामुळे सर्व दुकानं आणि रेल्वे सेवा देखील बंद केल्या गेल्या होता. परंतु नंतर कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला आणि देशात सर्वत्र लसीकरण मोहिम सुरू झाल्याने पुन्हा सगळं पूर्व पदावर येऊ लागलं. तसेच मुंबईत देखील लोकल प्रवास बंद असल्याने कर्मचारी वर्गाला प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. म्हणून नंतर सरकारने कोरोना लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकलचा प्रवास सुरू केला. ज्यामुळे दोन डोस घेतलेल्या नागरीकांना तरी रेल्वेने प्रवास करण्याची मुभा मिळाली.
लस घेतलेल्यांना रेल्वेने प्रवास करता येणार, यामुळे बहुतांश मुंबईकर लसीकरणाकडे वळले आहेत. परंतु एक डोस घेतलेल्यांना मात्र त्यांचे दोन डोस पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
परंतु आता लोकसभा सदस्य आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी असं वक्तव्य केलं आहे, ज्याची सगळेच मुंबईकर आतुरतेने वाट पाहात आहेत.
रावसाहेब दानवे म्हणाले की, "1 डोस घेतलेल्यांच्या रेल्वे प्रवासासाठी रेल्वेची काहीच हरकत नाही. राज्य सरकारने परवानगी दिल्यास केंद्राची हरकत नसेल."
रावसाहेब दानवेंनी आज मुंबई सीएसएमटी ते दादर असा लोकल प्रवास केला. त्याआधी प्रवाशांसोबत दानवेंनी चर्चा केली. त्यावेळी प्रवाशांकडून सिंगल डोस घेतलेल्यांना देखील रेल्वे प्रवास करता यावा अशी मागणी करण्यात आली. त्यावर दानवेंने सांगितले की, केंद्राची आणि रेल्वेची यावर काहीही हरकत नाही, परंतु राज्य सरकार यावर अंतीम निर्णय घेईल.
त्यामुळे आता सगळ्याच मुंबईकरांचे लक्ष राज्य सरकारकडे लागून आहे. रेल्वेची परवानगी मिळाल्यावरती आता राज्य सरकारने सुद्धा त्यावर सहमति दर्शवावी अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे.
तसेही नागरीक बाहेर बस किंवा इतर मार्गाने प्रवास करत आहेत, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्हीही वाया जात आहे. लोकांना पोटामुळे घराबाहेर पडावेच लागते, परंतु रेल्वे बंद असल्याने त्यांचा प्रवासातच अर्धा वेळ जातो. त्यात लोकं बसने प्रवास करतात तेव्हा बसमध्ये देखील काही प्रमाणात गर्दीही पाहायलाच मिळते. म्हणून सरकारने रेल्वे सुरू केल्याने आमचा वेळ तरी वचेल असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय भूमीका घेणार आहे याकडे सर्वांच लक्ष आहे.