मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; 'ही' मार्गिका बंद राहणार, वेळापत्रक वाचा

Mega Block On Mumbai Local Route: मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. या काळात अनेक लोकल सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 19, 2024, 07:27 AM IST
मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; 'ही' मार्गिका बंद राहणार, वेळापत्रक वाचा title=
Mumbai Local Train Update Central Railway announces 22 hrs Mega Block on suburban sections today

Mega Block On Mumbai Local Route: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कसारा स्थानकात नॉन इंटरलॉकिंग कामे आणि कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं तुम्ही जर प्रवासाचा बेत आखत असाल तर रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. मध्य रेल्वेवर तब्बल 22 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. 

कसारा स्थानकात घेण्यात येणारा हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री तीन वाजून 20 मिनिटांनी सुरू होऊन रविवारी रात्री 1 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. या ब्लॉक कालावधीत 22 लोकलसेवा मर्यादीत स्वरुपात धावणार आहेत. मध्य रेल्वेबरोबरच हार्बर मार्गावरही शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते साडेतीनदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

वेळापत्रक कसं असेल?

- मध्य आणि हार्बर मार्गावर शनिवारी मध्यरात्री व साडेतीन दरम्यान भायखळा व वडाळा रोडपासून सीएसएमटीपर्यंत लोकल बंद राहतील. 

- वसई रोड, भिवंडी रोड आणि ठाणे स्थानकांवर वसई रोडमार्गे वळवलेल्या सर्व अप आणि डाउन गाड्यांसाठी 2 मिनिटांचा अतिरिक्त थांबा मिळणार 

- धुळे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्पेस रद्द होणार 

- मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील 8 लोकल रद्द होणार 

- ठाणे ते कल्याण दरम्यान शनिवारी मध्यरात्री 12.30 ते 4.30 कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरही कुर्ला आणि वाशीदरम्यान रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत ब्लॉक राहिल.

- शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन 11.30,11.51,12.02 आणि 12.12 वाजता सुटणाऱ्या गाड्या मुलुंड आणि कल्याण स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार असून कोपर-ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. 

- कल्याणयेथून सीएसएमटीसाठी पहाटे 3.23 आणि 3.57 वाजता सुटणाऱ्या गाड्या ठाकुर्ली व कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत. 

कुर्ला ते वाशी वाहतूक बंद राहणार

हार्बर मार्गावरील ब्लॉकमुळं CSMT ते पनवेल बेलापूर आणि वाशीदरम्यान सकाळी 10.34 ते 3.36 पर्यंत लोकल सेवा बंद राहणार आहेत. या काळात सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशीदरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार, अशी माहिती देण्यात आली आहे. या कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजता ट्रान्स हार्बर मार्गावरुन प्रवास करता येऊ शकतात.