मुंबई : कोरोनाच्या सध्याची परिस्थिती पाहता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकांना हात जोडून 'डबल मास्क' घालण्याचे आवाहन केले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या व्यतिरिक्त ‘मुंबई महानगरपालिका’ यांनीही आपल्या ट्वीटर हँडलवर डबल मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनात असे म्हटले आहे की, आधी चेहऱ्यावर सूती मास्क लावा आणि मग त्यावर सर्जिकल मास्क लावा.
बीएमसीने आपल्या 'मायबीएमसी' ट्वीटर हँडलद्वारे ट्वीटवर असा दावा केला आहे की, एन -95 मास्क किंवा सर्जिकल मास्कमुळे कोरोनापासून 95% संरक्षण होते. तर कॉटन मास्कमुळे आपले 0% संरक्षण होते. त्यावर यूझर्सनी बीएमसीला प्रश्न विचारला की, बीएमसी कोणत्या आधारावर असा दावा करत आहे की, कॉटन मास्क 0% संरक्षण देतो आणि ए -95 मास्क किंवा सर्जिकल मास्क 95% सुरक्षित आहे?
लोकांचं असं म्हणणे आहे की, बीएमसी एन -95 मास्कची जाहिरात करत आहे का? काही नागरिकांचे म्हणणे आहे की, एक मास्क घातल्यामुळे काही लोकांना गुदमरल्यासारखे वाटते, तर असा परिस्थितीत दोन मास्क कसे घालता येणार? यावर मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचे म्हणणे आहे की, सूती कपड्याचे मास्कही सुरक्षित आहेत. परंतु बरेच लोक चेहऱ्यावरुन काढून टाकतात आणि त्याला योग्यरीत्या वापरत देखील नाही. म्हणून, डबल मास्क लावणे महत्वाचे आहे.
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांचे म्हणणे आहे की, बर्याच वेळा लोकं रुग्णालये आणि लसीकरण केंद्रांवर येतात पण मास्क व्यवस्थित लावत नाहीत. अशा लोकांचे हात बहुतेकदा त्यांच्या मास्कवर जातात आणि मग मास्क नाकावरुन ओठांवर येतो आणि नंतर तो गळ्यात किंवा हनवटीवर येतो. त्यामुळे अशा लोकांसाठी, डबल मास्क वापरने फार महत्वाचे आहे, जेणेकरून ते सहजपणे मास्क काढू शकणार नाहीत आणि मुखवटा योग्यरित्या वापरता येईल.
काही तज्ञांचे मत आहे की, सूती मास्क इतरांपेक्षा आपल्यासाठी अधिक प्रभावी आहे. परंतु आपल्याला कोरोना विषाणूपासून संपूर्ण संरक्षण देण्यात सक्षम तो नाही. यासाठी एकतर सर्जिकल मास्क लावावा किंवा एन-95 मास्क वापरावा.
मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंग चहल म्हणतात की, "मुंबईत विना मास्क घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल करणे खूप फायदेशीर ठरले. त्यामुळे मास्क बद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरली आणि ते त्यांच्या स्वतःच्या आरोग्याबद्दल आणि इतरांच्या आरोग्याबद्दल जागरूक झाले आहेत.
मुंबईत कोरोना संक्रमण कमी होण्यामागील हे एक मोठे कारण आहे. कितीही चाचणी, लसीकरण, कितीही औषधे असली तरीही मास्क आणि सामाजिक अंतरापेक्षा कोरोनापासून चांगले संरक्षण काही नाही."
मुंबई महानगरपालिकेने मागील एप्रिलपासून मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर ही कारवाई तीव्र करण्यात आली. आतापर्यंत 27 लाख लोकांवर मास्क न लावल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली आहे. या कारवाईतून आतापर्यंत 54 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.