BMC Budget 2024 : मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत गेल्या 7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून पालिकेच्या कारभाराचा गाडा आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal
) यांच्या माध्यमातून हाकला जात आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच प्रशासकाकडून बजेट सादर करण्यात आला होता. तर यावर्षी सलग दुसर्या वर्षीदेखील पालिकेच्या निवडणुका झाल्या नसल्याने प्रशासकच बजेट सादर करणार आहेत. गेल्या वर्षी पालिकेच्या बजेटमध्ये (Mumbai Budget 2024) 14.52 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. तर यावर्षीदेखील बजेटमध्ये विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांवरची करवाढ टळणार
कोरोना काळात पालिकेने दोन वर्षे मुंबईकरांवर कोणत्याही करवाढीचा बोजा टाकला नाही. त्यामुळे मालमत्ता करासारख्या करवाढीचे प्रस्ताव अंमलबजावणीविना पडून आहेत. मात्र हे वर्ष निवडणुकीचे (Election 2024) असल्याने मुंबईकरांवर कोणत्याही करवाढीचा बोजा पडणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बेस्टसाठी तरतुद
या वर्षी 'बेस्ट' प्रशासनानं तीन हजार कोटी रुपये सहाय्य स्वरूपात करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यावर्षी पालिका 'बेस्ट'ला किती मदत करते याकडे लक्ष लागले आहे
ठेवी घटल्याने अंतर्गत कर्जाचा पर्याय
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, सिमेंट काँक्रिट रस्ते, प्रस्तावित समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रकल्प अशा प्रकल्पांसाठी मोठी तरतूद करावी लागणार आहे. मात्र गेल्या वर्षभरात पालिकेच्या 92 हजार कोटींच्या ठेवींमधील 8 हजार कोटींच्या ठेवी घटल्याने मोठ्या प्रकल्पांची देणी देण्यासाठी अंतर्गत कर्जाचा विचार होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे बजेटचा आकडा मोठा दिसेल.
मोठ्या प्रकल्पांकरता निधी
गेल्या वर्षीच्या 53 हजार कोटींच्या बजेटमध्ये 27247 कोटींच्या प्रकल्पांवर पालिका आयुक्तांनी 52 टक्के निधी ठेवला होता. यावेळी पालिका आयुक्तांनी बजेटमध्ये आणखी वाढ करून एकूण बजेटच्या 56 टक्के निधी प्रकल्पांवर खर्च केला जाईल अंदाज बांधला जात आहे.
पायाभूत सोयीसुविधांवर भर
पाणी समस्या आणि स्वच्छतेवर भर देणार असून, मुंबईतील कचऱ्याची समस्या सोडवण्यासोबतच त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यावर भर देणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईला खड्डेमुक्त करण्यावर विशेष लक्ष असेल. याकरता तरतुदी होण्याची शक्यता
बीएमसीची आर्थिक परिस्थिती हाताळण्याचे आव्हान
बीएमसीच्या रिकाम्या तिजोरीत पैसा कुठून येणार याची अर्थसंकल्पात तरतूद करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. कारण रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बीएमसीला मुदत ठेवींमधून पैसे काढावे लागतात. 2022 मध्ये बीएमसीच्या मुदत ठेवी 91690 कोटी रुपये होत्या. जे 2023 मध्ये अंदाजे 5000 कोटी रुपयांनी कमी होऊन 86410 कोटी रुपये झाले आहे. मुंबईत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे, त्यामुळे बीएमसीला दरवर्षी 4500 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
स्वच्छता आणि सुशोभिकरणावर विशेष लक्ष- मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छता -सुशोभीकरण मोहिमांकरता निधी
मुंबई स्वच्छ ठेवण्य़ासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर पालिकेच्या घनकचरा विभागाकडून संपूर्ण मुंबईत स्वच्छता मोहिम राबवली जाते आहे. मुख्यमंत्री स्वतः मोहिमेत उतरून लक्ष देत आहेत. पर्यावरणाच्यादृष्टीनेही विविध योजना राबवल्या जाणार आहेत. तसेच पाणी प्रकल्प, नवीन जलवाहिन्या टाकणे, शिक्षण, आरोग्य तसेच समुद्राचे पाणी गोडे करणे, कोळीवाड्य़ांचा विकास, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, मार्केट, सिमेंट काँक्रिटिकरणाचे रस्ते, कचरा विल्हेवाटीसाठी योजना आदी प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.