Mumbai University Exam Answersheet Photocopy Rule Change : मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत एका दिवसात देण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याच दिवशी त्या विद्यार्थ्याच्या ईमेलवर त्याच्या विषयाची स्कॅन केलेली उत्तरपत्रिकेची छायाप्रत पाठविली जात आहे. याची अंमलबजावणी हिवाळी सत्रापासूनच्या परीक्षेपासून सुरू झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्यास विलंब लागत होता, तो आता मिटला आहे.
विशेष म्हणजे आजपर्यंत मागणी केलेल्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती विद्यार्थ्यांना पाठविलेल्या आहेत. 2023 च्या उन्हाळी सत्रापर्यंत पुनर्मूल्यांकनाचे अर्ज आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठीचे अर्ज ऑनलाईन मागविले जात होते. पण अर्ज केल्यानंतर त्याची छाननी करून त्याला त्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत पाठविली जात होती. त्यामुळे या प्रक्रियेला विलंब लागत होता. त्यामुळे पुनर्मूल्यांकनाच्या अर्जावरही विलंबानेच कार्यवाही होत होती.
आणखी वाचा : बाळासाहेबांच्या एका आवाजावर मुंबईतील नोकरी सोडणाऱ्या सूर्यकांत दळवींनी ठाकरेंची साथ का सोडली? वाचा सविस्तर पत्र
यामुळे आता यावर विद्यापीठाने एक युक्ती शोधून काढली आहे. मुंबई विद्यापीठाने एक नवी संगणक प्रणाली विकसित केली. 2023 च्या हिवाळी सत्राच्या निकालापासून सदर प्रणाली विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे एखाद्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर फॉटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाची एक लिंक उपलब्ध करून दिली आहे.
या लिंकद्वारे विद्यार्थ्याने पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास त्याक्षणी त्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापकांना उपलब्ध होईल. यामुळे पुनर्मूल्यांकनाचा विलंबही यामध्ये कमी झाला आहे. तसेच उत्तरपत्रिकेची छायाप्रतही विद्यार्थ्यास एका दिवसात त्याच्या ईमेलवर उपलब्ध झाली आहे, अशी माहिती गुण व प्रमाणपत्रे विभागाचे उपकुलसचिव हिम्मत चौधरी यांनी दिली.
आणखी वाचा : राज्यात 50 पेक्षा जास्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; लोकसभा निवडणुकीआधी सरकारचा मोठा निर्णय
"निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्यास आणि पुनर्मूल्यांकनास विलंब लागत होता. यासाठी मुंबई विद्यापीठाने ही प्रणाली विकसित केली. या प्रणालीमुळे तो विलंब होणार नाही", असे मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे म्हणाले.