महापालिका मुंबईकरांना देत आहे आप्तकालीन व्यवस्थापनेचे धडे, दुर्घटनेत जीवितहानी रोखण्यासाठी प्रशिक्षण

पावसाळ्यात घडणाऱ्या दुर्घटनांमध्ये मृत्यू रोखण्यासाठी आणि दुर्घटनास्थळी त्वरीत मदत मिळवण्यासाठी अॅक्शन प्लान

Updated: Jun 16, 2022, 07:57 PM IST
महापालिका मुंबईकरांना देत आहे आप्तकालीन व्यवस्थापनेचे धडे, दुर्घटनेत जीवितहानी रोखण्यासाठी प्रशिक्षण title=
संग्रहित फोटो

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबईत कधी एकदाचा मान्सून दाखल होतो याचीच उत्सुकता मुंबईकरांना लागलेली असते. मान्सून दाखल झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस मुंबईकर खूष असतात. मात्र एकदा हाच पाऊस मुंबईत धो-धो कोसळायला लागली की अनेकजणांच्या मनात धस्स होतं. 

कारण कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईची तुंबई तर झालेलीच असते याशिवाय इमारती कोसळणे, दरडी कोसळणे अशा दुर्घटनाही घडतात. यापूर्वी अनेकदा अशा घटना पावसात घडल्या आहेत. या दुर्घटना टाळणं खरंतरं शक्य नसतं, पण कमीत कमी जीवितहानी व्हावी यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे. 

पावसाळ्यात घडणाऱ्या दुर्घटनांमध्ये मृत्यू रोखण्यासाठी आणि दुर्घटनास्थळी त्वरीत मदत मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण दिलं जात आहे. यामुळे महापालिका आणि इतर यंत्रणांचे बचाव पथक पोहचण्यास काही अडचण निर्माण झाल्यास किंवा बचव पथके पोहचण्यापूर्वीच स्थानिकांना मदत कार्य सुरु करता येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. 

दहा हजार मुंबईकर घेत आहेत प्रशिक्षण 
या मोहिमे अंतर्गत अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि डॉक्टरांकडून दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी स्थानिकांना प्रशिक्षण दिलं जात आहे. दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी 10 हजार नागरिकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत 8 प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण वर्ग कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याची माहितीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या या मोहिमेत पालिकेला अनिरुद्ध अकॅडमीचीही मदत मिळत आहे. 

मुंबईत 72 रेड झोन, पावसात दरड कोसळण्याची शक्यता
गेल्यावर्षी चेंबूर आणि विक्रोळी येथे दरडी कोसळून 30 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. मुंबईत दरडी कोसळू शकतात अशा 72 ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. या ठिकाणांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यावर त्याठिकाणी बचाव पथक पोहचण्यास काही कालावधी लागतो. 

दुर्घटना घडल्यापासून बचाव पथक पोहोचण्याच्या काळात नागरिकांची पळापळ असते. अशा वेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे, त्यांना प्रथोमोपचार देणे असे प्रशिक्षण दिल्यास नागरिकांचे मृत्यू रोखता येऊ शकतात अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी दिली.