Mumbai Local : रेल्वेनं आणि त्यातही पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या अनेकांसाठीच ही चिंतेत भर टाकणारी बातमी. कारण, मागच्या काही दिवसांपासून सुरु असणारं अडचणींचं सत्र अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. इतकंच काय, तर या अडचणी दिवसागणिक वाढत असून, आता शेवटच्या टप्प्यातही रेल्वे प्रवास तुम्हाला मनस्तापच देणार आहे. कारण, मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 24 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.
निर्धारित नियमांनुसार पश्चिम रेल्वेवरील खार - गोरेगाव या मार्गावर 11 दिवसांचा ब्लॉक घेऊन सहाव्या मार्गिकेचं काम हाती घेण्यात आलं होतं. किंबहुना हे काम अद्यापही सुरु असून याच कामाचा शेवटचा टप्पा 4- 5 नोव्हेंबर रोजी असणार आहे. जवळपास 24 तासांचा ब्लॉक घेऊन हे काम पूर्ण करत रेल्वे मार्ग जोडण्याचं काम करण्यात येणार आहे. रेल्वे मार्ग जोडल्यानंतर या कामाची पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) 5 आणि 6 नोव्हेंबरला करतील. पाहणीनंतरच सहाव्या मार्गिकेवरील रेल्वे प्रवास सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, रेल्वेकडून हाती घेण्यात आलेल्या या कामांसाठी 7 ते 26 ऑक्टोबरदरम्यान दर दिवशी साधारण 5 तासांसाठी रात्रीच्या वेळी रेल्वेनं ब्लॉक घेतले. 27 ऑक्टोबरपासूनही ब्लॉक घेण्यात आले, परिणामी दर दिवशी पश्चिम रेल्वेच्या साधारण 100 ते 250 फेऱ्या रद्द झाल्या. तर, काही रेल्वेंचा वेग कमी करण्यात आला. काही लोकल विलंबानं धावल्या ज्यामुळं प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला.
इथं पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच तिथं मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण, मध्य रेल्वेच्या मार्गावर 6 नोव्हेंबर 2023 पासून 10 अतिरिक्त एसी लोकल सुरु करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील या लोकलचं वेळापत्रकही जारी करण्यात आलं आहे. यामध्ये गर्दीच्या वेळीसुद्धा प्रवाशांसाठी एसी लोकल चालवण्यात येणार आहे.