मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय; ५५ वर्षांवरील पोलिसांनी घरीच राहा

राज्यासह मुंबईत झपाट्याने वाढणारी coronavirus कोरोना रुग्णांची संख्या प्रशासनापुढे अडचणी उभ्या करत आहेत. कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंतेत टाकणारी असल्यामुळे यावर सातत्याने उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणांचा तणाव वाढत आहे.

Updated: Apr 28, 2020, 01:30 PM IST
मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय; ५५ वर्षांवरील पोलिसांनी घरीच राहा title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्यासह मुंबईत झपाट्याने वाढणारी coronavirus कोरोना रुग्णांची संख्या प्रशासनापुढे अडचणी उभ्या करत आहेत. कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंतेत टाकणारी असल्यामुळे यावर सातत्याने उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणांचा तणाव वाढत आहे.

लॉकडाऊनच्या काळात विविध ठिकाणी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस अधिकाऱी आणि कॉन्सेबल यांनाही कोरोनाचा धोका असल्याचं पाहायला मिळत आहे. हीच एकंदर परिस्थिती पाहता मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहेत. 

येत्या काळात मुंबई पोसील दलात कार्यरत असणाऱ्या ५५ वर्षांवरील पोलिसांना घरीच राहण्याचा सल्ला देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. तर, वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्तासाठी येऊ नका असंही सांगण्यात आलं आहे. 

 

कोरोनामुळं तीन पोलिसांचा जीन गमवावा लागल्यामुळे या कोरोना वॉरियर्सच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेत हा अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस दकलातही कोरनाचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यामध्ये अनेक पोलिसांना या विषाणूची लागण झाल्याचं निदर्शनास आलं. वेळीच कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आलेल्या या पोलिस कर्मचाऱ्यांपैकी अनेकांनी या विषाणूवर मातही केली. पण, या प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असणाऱ्या या मंडळींची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची असल्यामुळे आयुक्तांकडून हा निर्णय घेतला गेला आहे. 

पोलिसांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत पुढील सूचना देण्यात आल्या आहेत. 

-  ५५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घरीच थांबावं. 
- ५२ वर्षांवरील पोलीस अधिकारी ज्यांना मधुमेह, हायपर्टेंशनचा त्रास आहे, त्यांनीही गरीच थांबावं. 
- ३ मेपर्यंत पोलीस स्थानकांमध्ये तैनात असणारे अधिकारी, कर्मचारी, कॉन्स्टेबल हे १२ तास ड्युटी २४ तास रेस्ट शिफ्ट अशा तत्वावर काम करतील. 
- पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जवळपास २० हजारहून अधिकांना मल्टीविटॅमिन आणि प्रोटीन देण्यात आलं आहे. 
- पोलिसांसाठी खास रुग्णालयांची तरतूद करण्यात आली आहे. 
- शिवाय कोविड रुग्णालयांमध्येही पोलिसांसाठी विशेष तरतूद असेल. 
- फ्रंटलाईन ड्युटीवर असणाऱ्यांसाठी खाण्याची पाकिटं, रेशन, गरम पाण्याचे फ्लास्क अशी सर्व सोय चेकपॉईंटवर करण्यात आली आहे.
- ड्युटीवरच राहू इच्छिणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची सोयही करण्यात आली आहे.