मुंबई : साकीनाका बलात्कार आणि मृत्यू प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कठोर पावलं उचलली असून अशा घटना टाळण्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निर्भया पथकाची स्थापना करण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहे. या निर्भया पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी, एक महिला तसंच एक पुरुष अंमलदार आणि एक ड्रायव्हर अशा मनुष्यबळाचा समावेश असेल.
शाळा, महाविद्यालयं आणि नोकरी निमीत्ताने घराबाहेर असणाऱ्या मुली आणि महिलांची प्रत्यक्ष किंवा फोन कॉल्स, मॅसेज, ई-मेल व इतर सोशल मिडीयाचा वापर करूण छेड काढली जाते. समाजामध्ये महिलांविषयी आदरयुक्त भावना निर्माण करण आणि कायद्याची भीती निर्माण करणे या उद्देशाने तसंच महिलांवर होणाऱ्या अत्याचार, छेडछाडीचं समुळ उच्चाटन होण्यासाठी "निर्भया" पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
तसंच मुंबई पोलीस दला मार्फत 'एम पॉवर' ( M POWER ) या संस्थेच्या सहभागातुन “सक्षम" हा उपक्रम महिलांविरुध्द गुन्हयातील पीडीत महिला, पोस्को कायद्यातर्गत गुन्हयातील पीडीत, अल्पवयीन मुले, मुली यांना मानसीक दृष्ट्या सशक्त करण्याकरीता तसंच विधीसंघर्ष ग्रस्त बालके यांना योग्य मार्गदर्शन, गुन्हयांपासून परावृत्त करण्यासाठी मानोसपचार तंज्ज्ञांकडुन समुपदेशन करण्याकरीता राबविण्यात येणार आहे.
- प्रत्येक पोलीस ठाण्यात वुमेन सेफ्टी सेल (women safety cell) स्थापन करणार
- मुंबईच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात तैनात मोबाईल व्हॅनपैकी निर्भया पथकासाठी एक मोबाईल व्हॅन तैनात केली जाईल.
- प्रत्येक प्रादेशिक विभागाचे 9 महिला सहायक पोलीस आयुक्त/ महिला पोलीस निरीक्षक हे त्यांच्या प्रादेशिक विभागातंर्गत पोलीस ठाण्यांच्या निर्भया पथकाचे नोडल / पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून काम पाहतील.
- सदर निर्भया पथकामध्ये मपोउनि / मसपोनि दर्जाचे 9 अधिकारी, 1 महिला, 1 पुरुष अंमलदार आणि १ चालक अशा मनुष्यबळाची नेमणुक करण्यात यावी.
- निर्भया पथक स्थापन झाल्याची माहिती मुंबई शहरात सर्वत्र पोहोचविण्यासाठी रेडीओ, प्रसारमाध्यमे यांची मदत घेऊन नागरीकांमध्ये जागृती करावी.
- निर्भया पथकाची साक्षांकित केलेली स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. सदर नोंदवहीत दररोज केलेल्या कार्यवाहीची नोंद करण्यात यावी.
पर्यवेक्षकीय अधिकारी यांनी वेळोवेळी सदर नोंदवहीची तपासणी करावी.
- निर्भया पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना परिस्थिती हाताळण्यास सक्षम करण्याकरीता 2 दिवसाचे प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच ज्या पोलीस ठाणे हद्दीत बालगृहे / अनाथालये / मुलींची वसतिगृहे असतील त्या ठिकाणी गस्त करून तेथील गोपनीय माहिती प्राप्त करणेबाबत निर्भया पथकास प्रशिक्षण दयावे.
- प्रत्येक पोलीस ठाण्याने महिलांविरोधी घडणाऱ्या गुन्हयांचे हॉटस्पॉट निश्चित करावेत. पेट्रोलिंग पॅटर्न तयार करावा. झोपडपट्टी परीसर, मनोरंजन मैदाने, उद्याने, शाळा कॉलेज परिसर, चित्रपटगृहांचा परिसर, मॉल्स, बाजारपेठा, बसस्थानक / रेल्वेस्थानकाकडे जाणारे रस्ते / भुयारी मार्ग तसेच कमी वर्दळीची/ निर्जन स्थळे याची पडताळणी करून या ठिकाणांचाही समावेश करावा.
- रात्रीच्या वेळी एकटीने प्रवास करणाऱ्या महिलेने मदत मागितल्यास त्यांना सुरक्षितस्थळी पोहचण्याकरीता योग्य ती मदत करावी. पोलीस ठाणे हद्दीत एकटया राहणाऱ्या जेष्ठ नागरीक महिलांची यादी तयार करून गस्तीदरम्यान त्यांना भेट देवून त्यांना काही समस्या असल्यास निरसन करण्याचा प्रयत्न करावा.
- गेल्या 5 वर्षातील मुंबई शहरात महिला, लहान मुलांचे लैगींक शोषण करणारे अभिलेखावरील गुन्हेगारांची यादी तयार करावी.
- पोलीस ठाणेकडुन अशा गुन्हेगारांची यादी प्राप्त करून या गुन्हेगारांच्या हालचालीवर निगराणी ठेवावी. तसेच त्याबाबत स्वतंत्र नोंदवही ठेवून गुन्हेगारांच्या तपासणीच्या नोंदी वेळोवेळी घ्याव्यात
- प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त यांनी प्रादेशिक विभाग स्तरावर समुपदेशन केंद्र तसेच प्रत्येक परिमंडळ स्तरावर समुपदेशन केंद्राची व्यवस्था करावी. वरील समुपदेशन केंद्रावर अल्पवयीन मुली/ मुले यांचेकरीता पोषक वातावरण राहील याबाबत आवश्यक उपाययोजना करावी. त्या ठिकाणी पिडीत महिला, बळीत/पिडीत मुले संघर्ष ग्रस्त बालके यांना एम पॉवर या संस्थेतील मानसोपचार तंज्ञांकडुन समुपदेशन करावे
- प्रादेशिक विभाग स्तरावर निर्भया पथकातील अधिकारी व अंमलदारांना प्र न्यास.कार्यशाळा आयोजित करून त्यांना प्रशिक्षण द्यावे. प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त यांनी निर्भया पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांना पेन कॅमेरा सारख्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनीक उपकरणांच्या वापराबाबत प्रशिक्षण द्यावे.
- त्याचा वापर भा.दं.वि. कलम 354 (ड) अन्वये दाखल होणाऱ्या केसेसमध्ये पुरावा म्हणुन उपयुक्त ठरेल. तसेच दैनंदीन कामकाजादरम्यान कॅमेरामध्ये रेकॉडींग केलेली माहिती पोलीस ठाणेमधील संगणकात संग्रहीत ठेवण्यात यावी.
- प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवडयात महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यासाठी निर्भया पथकाची बैठक घेवून महिला सुरक्षीततेचा आढावा घ्यावा.
- निर्भया पथकाचे कामकाजातील त्रुटीबाबत मार्गदर्शन करून सुधारणा करण्याचे निर्देश द्यावेत. उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पथकास बक्षिस देवून प्रोत्साहीत करावे. जनमाणसांत पोलीसांची प्रतिमा उंचावेल याकरीता उल्लेखनीय कामगिरीला प्रसारमध्यमांदवारे प्रसिद्धी द्यावी.
- हेल्पलाईन क्रमांक 103 या नंबरची महिला सुरक्षेकरीता जास्तीतजास्त जागृती करावी.
- निर्भया पथकाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110 / 117 कलमाप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अभिलेख ठेवावा, तसंच महिलांची छेडछाड करणारे इसम, विनयभंग, बलात्कार, पोस्को यासारख्या सर्व लैंगीक अपराधातील आरोपीतांची नावे निर्भया पथकाचे अभिलेखामध्ये समाविष्ठ करावीत.
- निर्भया पथकाने शाळा, महाविद्यालये, महिलांची वसतीगृहे येथील महिला / मुली यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणेबाबत कार्यशाळा आयोजित कराव्यात. तसंच त्या ठिकाणी 'निर्भया पेटी' नावाने तकार पेटी ठेवण्यात यावी. गस्तीच्यावेळी सदर ठिकाणी भेट देवून तकार पेटीमध्ये दाखल तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात यावी. केलेल्या कार्यवाहीची निर्भया पथकाच्या नोंदवहीत नोंद घेण्यात यावी.
- झोपडपट्टी परीसरात लहान मुलांविरोधात घडणाऱ्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी परीसरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था यामध्ये पोक्सो कायद्याच्या तरतुदी, गुन्हयांना असणारी शिक्षा याबाबत निर्भया पथकाने जागृती करावी.
- महिला कायदेविषयक जागृती पुस्तिका तयार करून, महिला व विद्यार्थिनींकरीता 'प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित करून त्यामध्ये 'जागृती पुस्तीका' वाटप करून त्यांना महिलांविषयक काद्याबाबत जागरूक करावे.
- निर्भया पथकाचे अधिकारी यांनी शाळा, महाविद्यालये येथे आयोजित पालक मेळाव्यांना उपस्थित राहुन स्टँडर्ड पीपीटी द्वारे निर्भया पथकाबाबत थोडक्यात माहिती, स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन व महिलांचे संदर्भातील कादेशीर तरतुदी याबाबत प्रबोधन करावे. प्रादेशिक विभातील निर्भया पथकांच्या कामगिरीचा व घेतलेल्या बैठकीचा नियमित अहवाल या कार्यालयास न चुकता सादर करावा.