मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई: दरवर्षी पाऊस आणि रस्त्यावरचं खड्डे असं समीकरण पाहायला मिळते. अनेकदा या खड्ड्यांमुळे अपघात होतात आणि जीव देखील जातो. त्यामुळे प्रशासन खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्नशील असते. मुंबईतही पावसाळ्यात एकीकडे पाणी तुंबते तर दुसरीकडे रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते. दरवर्षी मुंबईकरांना या समस्यांना सामोरे जावे लागते. यावर्षी मुंबई महापालिकेने मान्सूनचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. यावर्षी मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाकडून मॉन्सूनपूर्व तयारी म्हणून १५०० मेट्रिक टन कोल्डमिक्सचा पुरवठा सर्व २४ वॉर्डात करण्यात आला आहे. तर एमएमआरडीएद्वारे ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला खड्डे बुजविण्यासाठी तसेच पाणी साचू नये म्हणून टीम सज्ज ठेवण्यात येणार आहे.
पॉटहोल ट्रॅकर अॅप कार्यन्वित
मुंबई महापालिकेचे पॉटहोल ट्रॅकर अॅप सध्या कार्यन्वित असून याद्वारे मुंबईकरांच्या तक्रारीचे निवारण केले जाते. या अॅपवर येणाऱ्या तक्रारींचे २४ ते ४८ तासात निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली. रस्त्यांवरील खड्डयांबाबत नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी महानगरपालिकेच्या ८९९९-२२८-९९९ या ‘व्हॉट्सअप चॅट’ क्रमांकासह महानगरपालिकेच्या अॅपवर आणि संकेतस्थळावर देखील ही सुविधा उपलब्ध असणार आहे.
याशिवाय मान्सूनची प्रत्येक खबरबात मुंबईकरांना आधीच कळावी यासाठी मुंबई महापालिका एक नवं अॅपदेखील लवकरच कार्यन्वित करणार आहे. मान्सून आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेत मान्सूनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे. पावसाळ्यात येणाऱ्या विविध अडचणींचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजना करत आहे. तरीही दरवर्षी मुंबईकरांना पावसाळ्यात वेवगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागतेच.