मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या एका खासगी बँकेत बँक मॅनेजरनेच खातेदारांचे पैसे सट्टयात उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे खातेदारांची झोप उडाली आहे.
मुंबईत्या दादर इथल्या एका खासगी बँकेतील बँक मॅनेजरला ऑनलाईन सट्टा खेळण्याचा नाद होता. या नादात त्याने खातेदारांच्या खात्यातली रक्कम परस्पर वळती केली. ही रक्कम थोडीथोडकी नाहीये, तर त्यानं तब्बल १ कोटी ८५ लाख रुपये सट्ट्यात गमावले आहेत. याप्रकरणी या बँकेतील दादर शाखेतील उपशाखा व्यवस्थापक विशाल गरूड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कागदपत्रांच्या छाननीत नोंदीपेक्षा रोकड जास्त असल्याचं दिसलं. मात्र प्रत्यक्ष तपासणात १ कोटी ८५ लाखांचा तुटवडा असल्याचं समोर आलं. त्यानंतर विशालनं बनावट व्यवहारांची नोंद करून बुकींच्या ९ बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केल्याचं उघड झालं. त्याच्याविरोधात माटुंगा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.