मुंबई : दोन दिवस मुंबईतली कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. इतक्यातच एका दिवसात तब्बल १८२ रुग्ण आढळल्याने मुंबईकरांचे पुन्हा धाबे दणाणले आहेत. सध्या तरी कोरोनापासून मुक्ती नसल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. मुंबईत सरकारी तसेच खासगी रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा धोका अद्याप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
वोक्हार्ट रूग्णालयातील २६, जसलोक रूग्णालयातील २४ नर्सेसना तर बॉम्बे हॉस्पिटलमधील १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोर हे देखील मोठं आव्हान असणार आहे.
वोक्हार्ट रूग्णालयातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत एकूण ७५ हून अधिक कर्मचारी वर्ग कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
जसलोक रूग्णालयातील संबंधित नर्सेस कुलाबा येथील क्वाटर्समध्ये क्वारंटाईन होत्या. त्यांचे क्वारंटाईन संपल्यानंतर कामावर रूजू होण्यापूर्वी चाचणी केली असता २४ नर्सेस कोरोना पॉझिटीव्ह निघाल्या आहेत.
जसलोकमधील एकूण ५० हून अधिक कर्मचारी कोरोना बाधित तर बॉम्बे हॉस्पिटलमधील एकूण १२ हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत शनिवारी कोरोनाचे आणखी १८४ रुग्ण आढळून आले. मुंबईत एकाच दिवसात इतके रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या धारावीतील १६ रुग्णांचा समावेश आहे. पालिका प्रशासनाकडून मुंबईतील आठ वॉर्डमध्ये अतिगंभीर परिस्थिती असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले होते.तर राज्यातही आज कोरोनाचे ३२८ नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये पुण्यातील ७८ नव्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ३,६४८ इतका झाला आहे.