VIDEO : मुंबईत 'FREE काश्मीर' पोस्टर दाखविणाऱ्या मराठी तरुणीचं स्पष्टीकरण

मुंबईत विद्यार्थ्यांनी गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) येथे एका तरुणीने 'फ्री काश्मीर' असे पोष्टर दाखविले.

Updated: Jan 7, 2020, 01:23 PM IST
VIDEO :  मुंबईत 'FREE काश्मीर' पोस्टर दाखविणाऱ्या मराठी तरुणीचं स्पष्टीकरण
महक मिर्झा प्रभू हिने व्हिडिओ जारी केला.

मुंबई : गेट-वे ऑफ इंडियाजवळच्या आंदोलनातलं फ्री काश्मीरचं पोस्टर आणि ते पोस्टर धरून उभी राहणारी मुलगी राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरली आहे. या मुलीचं नाव मेहक प्रभू असून ती काश्मीरी वगैरे नव्हे तर मराठी आहे. मुंबईत जन्मलेली आणि वाढलेल्या मेहकनं फ्री काश्मीरचं पोस्टर का दाखवलं यावर तिचं स्पष्टीकरण. जेएनयु हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत विद्यार्थ्यांनी गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) येथे आंदोलन केले. यावेळी एका तरुणीने 'फ्री काश्मीर' असे पोष्टर दाखविले. यावरुन जोरदार राजकारण करण्यात येत आहे. विरोधकांनी हे खपवून घेतले जाऊ नये तसेच हे पोष्टर दाखविणाऱ्यावर पोलिसांनी त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी केली. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. तर आंदोलनकर्त्यांनी मुंबईत 'फ्री काश्मीर'चा बोर्ड झळकावल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. मात्र, हा फलक दाखविणाऱ्या मुलीने याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. ती तरुणी आहे, महक मिर्झा प्रभू. (Mehak Mirza Prabhu) आपण स्टोरीटेलर (Story Teller) आहे. मी मराठी मुलगी आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला जगण्याचे स्वातंत्र्य हवे. काश्मीरमध्ये निर्बंध लादले गेले आहे. ते हटविले पाहिजे. त्यासाठी आपण 'फ्री काश्मीर'चा फलक हातात घेतला.

दरम्यान, जेएनयु हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत विद्यार्थ्यांनी केलेले ठिय्या आंदोलन अखेर ४० तासांनंतर मागे घेण्यात आले आहे. जेएनयुमधील हल्ला, सीएए आणि एनआरसीला विरोध कायम आहे. विविध पद्धतीने विरोध सुरूच राहील असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या ४० तासांपासून सुरू असलेले आंदोलन यशस्वी झाले आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे विद्यार्थ्यांनी जाहीर केले आहे. जेएनयूच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतल्या गेट-ऑफ इंडियाजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. मात्र गेटवे इथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे रस्ते वाहतुकीला अडथळा होत होता. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना सकाळी आझाद मैदानात हलवले. आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. मात्र आंदोलकांनी नकार दिल्यामुळे त्यांना पोलीस व्हॅनमधून आझाद मैदानामध्ये नेण्यात आले होते. पोलिसांची परवानगी न घेता बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महक प्रभू हिने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याने गेटवे ऑफ इंडियावर प्रदर्शन केल्यावर मी एक पोस्टर उचलले. तो त्याठिकाणी पडलेला होता. मंगळवारी ६ जानेवारीला लोकशाहीवर विश्वास असणाऱ्यांनी आंदोलन केले. मीही त्या आंदोलनात सहभागी झाले. त्याठिकाणी एक फलक पडलेला होता. त्यावर फ्री काश्मीर लिहिलेले होते. मी तो उचलला. कारण काश्मीरमध्ये इंटरनेट आणि मोबाईल सेवा सुरु करण्यासाठी मी यामाध्यमातून सांगायचे होते. तो तेथील लोकांचा मुलभूत स्वायत्त  अधिकार आहे. मात्र, या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवले जात आहे. 

.... मी काश्मिरी नाही, मी मुंबईची मुलगी आहे. मी मराठी मुलगी आहे. मी सामान्य भारतीयांप्रमाणे लोकशाही अधिकारासाठी आवाज उठवत होते. हाच माझा उद्देश होता. बाकी काही नाही. मी स्टोरी टेलर आहे. मी एक सामान्य व्यक्ती आहे. मी कोणत्याही गॅंगचा भाग नाही.'

याआधी मुबंई झोन-१चे डीसीपी संग्राम सिंह यांनी झी मीडियाला सांगितले, “गेटवेवर विरोध करताना दाखविण्यात आलेल्या फ्री काश्मीर पोस्टरची आम्ही गंभीर दखल घेतली आहे.” झी मीडियाचे प्रतिनिधी अंकुर त्यागी यांनी संग्राम सिंह यांना विचारले होते की, पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील का आणि या पोस्टरसह तेथे उभी असलेल्या मुलीची ओळख सांगतिल का? त्यावेळी त्यांनी 'होय, नक्कीच.' असे उत्तर दिले होते.

दरम्यान, गेट ऑफ इंडिया येथे आंदोलन करणाऱ्या निदर्शकांना आझाद मैदानात हलविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. प्रथम, पोलिसांनी आंदोलकांना सुरक्षिततेसाठी हा संवेदनशील परिसर रिकामा करण्याचे आवाहन केले. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, येथे सर्व काही आमच्या नियंत्रणाखाली असेल. परंतु आंदोलकांनी पोलिसांचे म्हणणे ऐकले नाही, त्यानंतर पोलिसांनी त्यांना त्याठिकाणाहून आझाद मैदानात हलविले.

दिल्लीतील जेएनयूच्या संकुलात रविवारी तोंडाला कापड बांधुने गुंडांनी विद्यार्थ्यांवर रात्री हल्ला केला. या हल्ल्यात ३६ जण जखमी झाले. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आइशी घोष यांच्यासह अनेकांना रक्तबंबाळ करणाऱ्या हल्लेखोरांच्या धुडगुसाचे चित्रण रविवारी सायंकाळी माध्यमांत प्रसारित झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. त्यानंतर मुंबईत आंदोलन करण्यात आले. तसेच  पुण्यातील ‘एफटीआयआय’मध्ये आणि मुंबईत गेट वे येथे रविवारी रात्रीपासूनच निदर्शने सुरू झाली. सोमवारी पाँडेचेरी ते  चंदीगड आणि अलिगड ते कोलकाता येथील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. बंगळूरु , मुंबईतील आयआयटी, टाटा समाजविज्ञान संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अलिगड मुस्लीम विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, प्रेसिडेन्सी विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केलीत.