मुंबई : मुंबईकरांसाठी टॅक्सीचालकांची मुजोरी काही नवीन नाही. मात्र या मुजोर टॅक्सी चालकांमुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर ही घटना घडली आहे. पीडित व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका आला होता. मात्र एकही मुजोर टॅक्सीचालक रुग्णाला घेऊन रुग्णालयात जाण्यास तयार होता नव्हता.
टॅक्सी चालकांच्या या मुजोरीमुळे रुग्णाला आपला जीव गमवावा लागलाय. मोहम्मद युसूफ असं या मृत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळतेय. ते नांदेडचे रहिवासी होते.
धक्कादायक म्हणजे, पोलीस अधिकाऱ्यांनाही मुजोर चालक जुमानत नव्हते. समोर आलेल्या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतंय की, ह्रदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती स्ट्रेचरवर झोपलीय. यावेळी तिथे उपस्थित पोलीस आणि इतर लोक त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी टॅक्सी चालकांना बोलावत होते.
रेल्वे स्थानकाबाहेर अनेक टॅक्सी पार्क करण्यात आल्या होत्या. परंतु, वारंवार हाक मारुनही एकही टॅक्सी चालक मदतीसाठी पुढे आला नाही.