सावधान! मुंबई ते दिल्ली प्रवास म्हणजे 'चोरांची राजधानी'

मुंबई ते दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन राजधानी वातानुकूलित ट्रेनमध्ये महिन्याभरात १५ चोऱ्या झाल्या आहेत.

Updated: Sep 10, 2017, 08:14 PM IST
सावधान! मुंबई ते दिल्ली प्रवास म्हणजे 'चोरांची राजधानी' title=

मुंबई : मुंबई ते दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन राजधानी वातानुकूलित ट्रेनमध्ये महिन्याभरात १५ चोऱ्या झाल्या आहेत. प्रवाशांच्या किमती वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या चोरांचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यामुळे चोरांची 'राजधानी' अशीच ओळख सध्या या गाडीची होत आहे.

रेल्वेच्या वातानुकूलित आरामदायी प्रवासासाठी जादा पैसे मोजल्यानंतरही प्रवाशांना कोणतीही सुरक्षा नाही, असंच म्हणावं लागेल, कारण  एका महिन्यात पश्चिम रेल्वेवरील राजधानी ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागला आहे. 

१८ जुलै २०१७ ते १६ ऑगस्ट २०१७ या एका महिन्याच्या आत एक नाही, दोन नाही तर तब्बल १५ चोऱ्या मुंबई ते दिल्ली राजधानी आणि मुंबई ते हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी या दोन वातानुकूलित एक्स्प्रेसमध्ये झाल्याची माहिती समोर आली. 

१८ जुलै रोजी गाडी नंबर १२९५१ या दिल्लीहून मुंबई सेंट्रलला येणाऱ्या ट्रेनच्या ए-१ डब्यात एका प्रवाशाच्या सामानावर चोरांनी डल्ला मारला. त्यात दोन मोबाइल, रोख रक्कम आणि काही दागिने असा १ लाख ९५ हजार ५५० रुपयांची मालमत्ता चोरीला गेली.

गाडी क्रमांक १२९५१ आणि १२९५२ अशी मुंबई सेंट्रल ते दिल्ली अशी वातानुकूलित राजधानी ट्रेन आहे, तर ट्रेन नंबर १२९५३ ही मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती वातानुकूलित राजधानी दुसरी गाडी आहे.