Mumbai University Fake Social Media Accounts: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे बनावट संकेतस्थळ आढळून आल्याने अशा बनावट संकेतस्थळापासून सर्व विद्यार्थी आणि भागधारकांनी सावधान राहण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे प्रवेशासाठी व इतर अनुषंगिक बाबींसाठी https://mu.ac.in/distance-open-learning हेच अधिकृत संकेतस्थळ असून फक्त याच संकेतस्थळाचा वापर करावा असेही आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. विद्यापीठाने याबाबतची गंभीर दखल घेत बीकेसी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु असून प्रवेश प्रक्रियेस 30 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी https://mucdoeadm.samarth.edu.in/ फक्त या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. तर पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या प्रवेशासाठी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षासाठी https://idoloa.digitaluniversity.ac/ फक्त या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन अर्ज करावे असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
तसेच विविध समाजमाध्यमात मुंबई विद्यापीठ आणि दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या नावे बनावट अकाऊंट्स तयार करण्यात आले असून अशा बनावट अकाऊंट्सपासूनही सावधान राहण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र आणि मुंबई विद्यापीठ यांचे अधिकृत समाजमाध्यमांचे अकाऊंट असून फक्त अशाच अधिकृत अकाऊंट्सवरून प्रसिद्ध केलेली माहिती खरी समजण्यात यावी असेही विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
वीरमाता जीजाबाई तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रसाद कारंडे यांनी नुकताच मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा कार्यभार स्विकारला. व्यवस्थापन परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मावळते प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांनी डॉ. प्रसाद कारंडे यांना कुलसचिव पदाचा कार्यभार सोपवला. 17 ऑगस्ट 2024 रोजी डॉ. प्रसाद कारंडे यांची निवड समितीद्वारे मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी निवड करण्यात आली होती. डॉ. प्रसाद कारंडे हे वीरमाता जीजाबाई तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे पूर्णवेळ सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी बीई (मॅकेनिकल) आणि एमई (प्रोडक्शन) शाखेत पदव्युत्तर पदवी आणि अभियांत्रिकी शाखेत पीएचडीचे शिक्षण घेतले आहे. डॉ. प्रसाद कारंडे यांना एकूण 28 वर्षांचा शैक्षणिक आणि प्रशासकीय अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदाचा यशस्वीरित्या प्रभारी कार्यभार सांभाळला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी डॉ. प्रसाद कारंडे यांचे अभिनंदन करून पुढील भविष्यकालिन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय कामकाजात गतिमानता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्वासाठी डिजिटायझेशन वर भर देऊन, सर्वांच्या सहकार्याने काम करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे डॉ. प्रसाद कारंडे यांनी पदभार स्वीकारतेवेळी सांगितले.