नागपूर : मुंबई विद्यापीठ ऑनलाईन मूल्यांकन घोटाळ्याच्या चौकशीची सरकारनं विधानसभेत घोषणा केली. माहिती तंत्रज्ञान सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी होईल. या चौकशीनंतर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
या समितीत माहिती तंत्रज्ञान सचिव, आयआयटीचे दीपक पाठक आणि व्हीजेटीआयचे संचालक धीरेन पटेल यांचा समावेश आहे. तीन महिन्यात अहवाल येईल. या अहवालानुसार गुन्हा दाखल करायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती विधानसभेत रविंद्र वायकरांनी दिली.
तर राज्यपालांनी कुलगुरूंचा राजीनामा मगितल्याची आमच्याकडे माहिती नसल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी म्हटलंय. मात्र, विभागीय चौकशीत चुका आढळल्या. त्याचा अहवाल आम्ही राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर कुलगुरुंचा राजीनामा घेण्यात आला. तसंच दोषींवर कारवाई होणारर आणि कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसल्याचं शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं.