मुंबई विद्यापीठ ठरले सर्वोत्कृष्ट, राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारात अव्वल

Mumbai University NSS: मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने दिलेल्या भरीव  योगदानाची दखल घेण्यात आली.

Updated: Nov 7, 2023, 03:11 PM IST
मुंबई विद्यापीठ ठरले सर्वोत्कृष्ट, राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारात अव्वल title=

Mumbai University NSS: राज्य शासनाने राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार जाहीर केले असून मुंबई विद्यापीठास सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव तथा कार्यक्रम समन्वयक सुधीर पुराणिक यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सन 2021-22  या वर्षासाठी जाहीर केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कारात मुंबई विद्यापीठ अव्वल ठरले आहे. निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगिकृत कामात प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या निस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टिने मुंबई विद्यापीठास राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने दिलेल्या भरीव  योगदानाची आणि केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत विद्यापीठास सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार म्हणून आर. डी. नेशनल महाविद्यालयातील विजेंद्र शेखावत यांची निवड करण्यात आली. तर याच महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयातील विद्यार्थी ए. सेल्वा प्रकाश या विद्यार्थ्यास सर्वोत्कृष्ट स्वयंसेवकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन या सर्व विजेत्यांचा  सत्कार केला जाणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने पुरस्कार जाहीर केलेल्या वर्षात उल्लेखनिय कामगीरी केली आहे. विविध रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सर्वाधिक 78 हजार 945  युनिट रक्त जमा, सुमारे 2 कोटी रुपयाची पुरग्रस्ताना मदत, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अनेक  गरजवंताना मदत, आर्सेनिक अल्बलचे वाटप, दोन हजाराहून अधिक गृहसंकुलाचे निर्जंतुकीकरण, मास्क आणि सेनेटायझरचे वाटप, दत्तक गावे, आरोग्य, नेत्र, लसीकरण शिबिरांचे आयोजन, वृक्षारोपण, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, कोव्हिड लसीकरण मोहीम, विविध जनजागृतीचे कार्यक्रम, एड्स/ आरोग्य विषयक जनजागृती, पर्यावरण जनजागृती, बेटी बचाओ/महिला सशक्तीकरण, उद्योजकता विकास कार्यक्रम, अंमली पदार्थ आणि द्रव्यांचा गैरवापर रोखणे, अल्पसंख्याक हक्कांबाबात जनजागृती केली. 

अन्न सुरक्षा आणि अन्नाचे महत्त्व, एक भारत श्रेष्ठ भारत, प्राण्यांचे कल्याण आणि प्राण्यांवरील क्रौर्य रोखणे आणि कायदा, सायबर जागृकता, वाचन प्रेरणा दिन, कुटुंब कल्याण, सेंद्रीय शेती बाबत जागृकता, स्टेम सेल, थेलेसेमिया जागृकता, कर्करोग जागृकतादेखी मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आली. 

यासोबतच बांबू आणि इको फ्रेंडली उत्पादने, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, फिट इंडिया अभियान, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमे, विविध समाजकल्याण योजना, मतदार जनजागृती, योगा कार्यक्रम, हरीत खेडे, खेड्यापाड्यातील सार्वजनिक ग्रंथालये आणि स्टार्ट अप आणि इन्क्युबेशन ‘गो शून्य’, रोटरी क्लबच्या माध्यमातून विद्यानगरी संकुलात बायोडायव्हर्सिटी पार्कची निर्मिती, सौंदर्यीकरण असे विविध कार्यक्रम आणि समाजपयोगी उपक्रम मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या मार्फत वर्षभर राबविले गेले. 2021-22 या वर्षात रक्तदानासाठी राज्यस्तरीय पुरस्कारांने मुंबई विद्यापीठास गौरविण्यात आले. आजमितीस मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेची 459 युनिट कार्यरत असून 41 हजार 500 स्वयंसेवक कार्यरत आहेत.

'मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षामार्फत नेहमीच विविध समाजपयोगी उपक्रम राबविली जातात. एनएसएसच्या माध्यमातून दिलेल्या भरीव योगदानाची आणि केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाने मुंबई विद्यापीठाच्या या निस्वार्थ सेवेचा केलेला यथोचित गौरव ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.