वरळीत सापाच्या भीतीने उडाली स्थानिकांची झोप

 पालिकावृंद सोसायटीतले रहिवासी सध्या जीव मुठीत घेऊन जगताहेत

Updated: Aug 5, 2018, 10:18 PM IST

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या वरळीमधल्या पालिकावृंद सोसायटीतले रहिवासी सध्या जीव मुठीत घेऊन जगताहेत...नकोसे पाहुणे घरी नियमित हजेरी लावत असल्यानं या रहिवाशांची अक्षरश: झोप उडालीय.. 

नागिणीची पिल्ल 

वरळीत सस्मिराच्या पाठच्या बाजूस असलेली ही पालिकावृंद सोसायटी... सध्या या सोसायटीत रहाणाऱ्या रहिवाशांची खासकरुन ज्येष्ठ नागरिकांची झोप उडालीये.. डोळा चुकवून ते कधी घरात शिरतील आणि घात होईल या दहशतीत सगळे इथं रहातात.. या साऱ्यांची झोप उडवलीये ती नागाच्या पिल्लांनी.. सोसायटीला लागून असलेल्या जागेत एका नागिणीनं पिल्लांना जन्म दिलाय.. त्यामुळे सोसायटी आणि परिसरात या नागाच्या पिलांचा सुळसुळाट झालाय..

रहिवाशांच्या जीवाशी खेळ 

पालिकावृंद सोसायटीला लागून एक पडीक वादग्रस्त बांधकाम आहे. त्याच्या आजूबाजूला साचलेलं डेब्रिज, कचरा, तिथं असलेला उंदीर घुशींचा वावर यामुळे हे बांधकाम सापांचा अड्डाच झाला आणि रहिवाशांची डोकेदुखीही झालीयं.रहिवाशांनी या त्रासातून सुटका होण्यासाठी दोन-तीन वेळा सर्पमित्रांचीही मदत घेतली.. पण हा तात्पुरता ईलाज ठरतोय... वादग्रस्त पडीक बांधकाम तिथून हटत नाही, तोपर्यंत यातून सुटका नाही.. त्यामुळे रहिवाशांच्या जीवाशी सुरु असलेला हा खेळ स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तातडीनं थांबवणं गरजेचं आहे.