विद्यार्थ्यांना आता भाजपाचा इतिहास शिकवला जाणार, विद्यापीठ अभ्यासक्रमात सुधारणा

नागपूर विद्यापीठात आता चक्क भाजपचा इतिहास शिकवला जाणाराय.. केवळ भाजपच नव्हे तर रामजन्मभूमी आंदोलनाचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय... विद्यापीठ अभ्यासक्रमात आणखी काय सुधारणा करण्यात आल्यात पाहूयात

Updated: Aug 30, 2023, 10:00 PM IST
विद्यार्थ्यांना आता भाजपाचा इतिहास शिकवला जाणार, विद्यापीठ अभ्यासक्रमात सुधारणा title=

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Nagpur University) अभ्यासक्रमात (Curriculum) नवे बदल करण्यात आले आहेत. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (New National Education Policy), विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळानं एम.ए.च्या द्वितीय वर्षातील चौथ्या सत्राच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे.  त्यानुसार काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासाला (Hisotry) कात्री लावण्यात आलीय. तर केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपचा (BJP) इतिहास आता अभ्यासक्रमात नव्यानं शिकवला जाणार आहे. 

नागपूर विद्यापीठात भाजपचा अभ्यास 
इतिहासाच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती 1948 ते 2010 अशी वाढवण्यात आलीय. 'राष्ट्रीय राजकीय पक्ष' प्रकरणात काँग्रेसचा इतिहास कमी करण्यात आलाय. त्याऐवजी आता जनसंघाची स्थापना, भाजपची स्थापना, विस्तार, विचारधारा, राष्ट्रीय भूमिका आदींची सविस्तर मांडणी करण्यात आलीय. त्याशिवाय '1980 ते 2000 दरम्यानचे आंदोलन' म्हणून रामजन्मभूमीचं आंदोलन शिकवलं जाणाराय. हा अभ्यासक्रम 2023-24 या शैक्षणिक वर्षांपासून लागू करण्यात येणार आहे.

नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी सर्व पक्षांचा तसंच जनसंघाचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ठ होता. आता जनसंघाच्या इतिहासात भाजपाचा इतिहासाचा समावेश करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रम बदलाच्या या निर्णयामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपाचा इतिहास सांगण्यासारखा आहे काय? त्यांना कुठला इतिहास आहे? असा सवाल विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांना स्वांतत्र्याआधीच्या लढाई इतिहास आहे, ना स्वांतत्र्यानंतर देश उभारणीचा इतिहास आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ज्यावेळी इंग्रज, पोर्तुगल, मोघलांचं राज्य होतं, या विचारधारेची माणसं सत्ताधाऱ्यांबरोबर होती. आता सत्ता आल्यानंतर स्वत:ची विचारधारा रुजवून या देशाची विभागणी करु पाहात असतील तर त्यांची भूमिका देशवासियांनी समजली पाहिजे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. 

तर भाजपाचा इतिहास खूप गौरवशाली आहे, शुन्यातून पक्ष उभा राहिला आहे, असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. भाजपचा इतिहास का काँग्रेससारखा नाहीए, काँग्रेस एका घराच्या जोरावर राजकारम करत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केलीय. 

याआधी 2019 साली विद्यापीठानं बीए अभ्यासक्रमात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्र निर्माणात योगदान’ या प्रकरणाचा समावेश केला होता. त्यावेळी जोरदार विरोध झाला होता. आता इतिहासातील भाजपचं महत्त्व वाढवण्याचा नागपूर विद्यापीठाचा हा निर्णय पुन्हा एकदा वादाचं कारण ठरलाय.