रामराजे शिंदे, नवी दिल्ली/मुंबई - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, खासदार नारायण राणे यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत आणि ते काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे, अशा बातम्या येत असतानाच झालेल्या या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले असून, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाने तीन जागांची मागणी केली आहे. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदूर्ग, माढा आणि औरंगाबाद या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपूत्र नीलेश राणे यांच्यासाठी रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे. याच मतदारसंघाचे त्यांनी याआधी प्रतिनिधित्व केले आहे. रत्नागिरी-सिंधुदूर्ग हा लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे. तर औरंगाबादमध्येही शिवसेनेचेच चंद्रकांत खैरे खासदार आहेत. आता शिवसेना-भाजप युती झाली तर या मतदारसंघाचे काय होणार, ते राणे यांच्या पक्षासाठी सोडायला शिवसेना तयार होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नारायण राणे हे जरी भाजपसोबत निवडणूक लढविणार असले, तरी ते भाजपचे चिन्ह घेऊन निवडणूक लढविणार नाहीत. ते त्यांच्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे भाजपसोबत असले तरी नारायण राणे स्वतःचा वेगळा झेंडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चा समाधानकारक झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वर्षा निवासस्थानावरून बाहेर पडताना नारायण राणे यांच्या चेहऱ्यावर बोलके स्मितहास्य होते.