नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद

मुंबईतील धान्य पुरवठ्यावर परिणाम होणार?

Updated: Apr 13, 2020, 02:51 PM IST
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद title=

स्वाती नाईक, नवी मुंबई :  नवी मुंबईतील धान्य आणि ड्रायफ्रूट मार्केट सध्या बंद ठेवण्यात आलं आहे. कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या समस्यांमुळे मार्केट बंद ठेवण्यात आले असून तांदुळ, गहू, डाळ असं अन्नधान्य आणि कडधान्य तसंच हळद, मिरची, गरम मसाले असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आदीचे या बाजारातील व्यवहार ठप्प झाले आहेत.

एपीएमसी मार्केट १५ एप्रिलपासून पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न आहे. पण त्याआधी शेतकरी, व्यापारी आणि माथाडींसमोर असलेल्या समस्या दूर करणं आवश्यक आहे.

एपीएमसी मार्केट बंद करण्याचे प्रमुख कारण म्हणजे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी. नेहमीच्या व्यापाऱ्यांप्रमाणेच एनजीओ तसेच किरकोळ ग्राहकही मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येत होते. त्यामुळे सोशल डिस्टसिंगचे नियम पाळले जात नव्हते. त्यामुळे कोरोना पसरण्याचा धोकाही होता.

त्याचप्रमाणे व्यापारी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत होते आणि त्यांना मार्केटमध्ये पोहचण्यासाठी वाहनांची व्यवस्था नव्हती. याशिवाय माथाडी कामगारांची संख्याही अपुरी होती. मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि अन्नधान्याची वाहनं मार्केटमध्ये येत होती. पण त्यातील माल उतरवण्यासाठी पुरेसे माथाडी कामगार उपलब्ध नव्हते. त्यामुळे मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्केटबंदचा मुंबईवर परिणाम?

एपीएमसी मार्केट बंद असल्यानं मुंबईत अन्नधान्य पुरवण्यावर परिणाम होईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण एपीएमसी मार्केटमध्ये रोज अन्नधान्याच्या ३०० गाड्या आणि मसाल्याच्या १५० गाड्या येत होत्या. याशिवाय मार्केटमध्ये रोज फळांच्या २०० गाड्या येत होत्या.

एवढा पुरवठा बंद झाला तरी मुंबईत टंचाई भासणार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कारण मुंबईत अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी गेल्या २० दिवसांत थेट मुंबईत ४ हजार गाड्या अन्नधान्य व अन्य वस्तू पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यात धान्य, तेल, तूप, मसाले आदी माल पाठवण्यात आला आहे.

 

एपीएमसी मार्केटमधील भाजी मार्केट शनिवारपासूनच बंद आहे. या मार्केटमध्ये रोज ५०० ते ७०० गाड्या येत असतात. त्यात कांदा, बटाट्याच्या १०० ते १२० गाड्या असतात. एपीएमसी मार्केट बंद असलं तरी सध्या १०० हून अधिक गाड्या थेट मुंबईत पाठवल्या जात असल्याचं सांगितलं जात आहे.