अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत.  

Updated: Nov 28, 2019, 11:54 AM IST
अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंता वाढली आहे. त्याआधी त्यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ते एका रात्रीच ते भाजपच्या गोटात गेले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत त्यांचे सरकार स्थापन केले आणि ते स्वत: उपमुख्यमंत्री झालेत. त्यानंतर मोठा सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला. हे प्रकरण नंतर सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. न्यायालयाचा आदेश आल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि फडणवीस सरकार अल्पमतात आले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्तेतून पायउतार झाले. केवळ साडेतीन दिवसांचे सरकार त्यांनी चालवले. 

अजित पवार नॉट रिचेबल झाले असून ते त्यांच्या निवासस्थानी नसल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. यापूर्वी सकाळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ते कोणाच्याही संपर्कात नाहीत. एकीकडे उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला मिळूनही कोण उपमुख्यमंत्री होणार याबाबत राष्ट्रवादीने निर्णय घेतलेला नाही. आज शिवतीर्थावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेत आहेत,राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि भुजबळ शपथ घेणार आहेत, पण उपमुख्यमंत्री कोण हे मात्र अजून ही स्पष्ट नाही. उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव पुढे येत होते. मात्र, ते अचानक मागे पडले. तर दुसरीकडे असेही बोलले जात आहे, ते मुख्यमंत्रीपदासाठीही आग्रही आहेत. अडीच वर्षे हे पद मिळावे, अशी सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांना द्यावे, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. अजित पवारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे अनेक समर्थक त्यांच्या घरी आणि धनंजय मुंडे यांच्या घरी जमले आहेत. अजित पवार धनंजय मुंडे यांच्या घरी येणार असल्याची चर्चा असल्याने तिथेही समर्थकांची गर्दी केली होती. मात्र अजित पवार कुणालाही भेटायला तयार नाहीत, अशी माहिती आहे.