मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. लिलावतीत त्यांच्या स्वादुपिंडावर शस्त्रक्रियाही होणार आहे. तत्पूर्वी भुजबळांनी मुंबईतल्या सत्र न्यायालयात सेशन कोर्टात हजेरी लावली. तसेच सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं.
जामिनासंदर्भातील कागदपत्रांवर सही करण्यासाठी सेशन कोर्टात आल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितले. केईएम रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांना जामीन मंजूर झाला होता.
जामिन मंजूर झाल्यानंतरही त्यांनी केईएम रुग्णालयात थांबून उपचार घेतले होते. त्यामुळं त्यांना कोर्टात जाणं शक्य झालं नव्हतं. अखेर तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी सेशन कोर्टात जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर भुजबळ यांनी सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं.